भारताचे माजी क्रिकेटपटू आणि यष्टीरक्षक फारुख इंजिनीअर यांनी लोकेश राहुलच्या फलंदाजांची स्तुती केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये लोकेश राहुल ज्या प्रगल्भतेने फलंदाजी करतो ते पाहता, तो भारताचा पुढचा सचिन तेंडुलकर किंवा सुनील गावसकर बनू शकतो. भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी कसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. त्याआधी दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये फारुख इंजिनीअर यांनी आपलं मत मांडलं आहे. बर्मिंगहॅमच्या मैदानात हा सामना होणार आहे.
आतापर्यंत २४ कसोटी सामन्यांमध्ये लोकेश राहुलच्या नावावर १५१२ धावा जमा असून, यामध्ये ४ शतकं तर ११ अर्धशतकांचा समावेश आहे. इंग्लंडविरुद्ध २०१६ साली केलेल्या १९९ धावा ही लोकेश राहुलची कसोटी क्रिकेटमधली सर्वोत्तम धावसंख्या आहे.
“लोकेश राहुल सर्वोत्तम खेळी करतो आहे. त्याच्यामध्ये भारताचा दुसरा सचिन तेंडुलकर किंवा गावसकर बनण्याची क्षमता आहे. फलंदाजीदरम्यान त्याची शैली मला अधिक प्रभावीत करते. आगामी इंग्लंडविरुद्ध मालिकेत त्याची भूमिका महत्वाची असणार आहे. जर या मालिकेत त्याच्याकडून चांगली कामगिरी झाली नाही तर मला त्याचं खूप आश्चर्य वाटेल.” Firstpost या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत फारुख इंजिनीअर यांनी लोकेशचं कौतुक केलं. यामुळे आगामी कसोटी मालिकेत राहुल कशी खेळी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.