यंदाच्या टी-२० वर्ल्डकपनंतर विराट कोहली भारतीय संघाच्या टी-२० कप्तानपदाला अलविदा म्हणणार आहे. त्यानंतर रोहित शर्मा हा भारताचा नवा टी-२० कप्तान असेल, अशा चर्चाही रंगू लागल्या आहेत. पण, या दोघांव्यतिरिक्त एक नवा खेळाडू मैदानात उभा राहिला असून न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत तोच टीम इंडियाची कमान सांभाळणार असल्याचे वृत्त आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर केएल राहुलला नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते. या मालिकेतील कर्णधारपदाच्या शर्यतीत तो आघाडीवर असल्याचे मानले जात आहे. टी-२० विश्वचषकानंतर न्यूझीलंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. पहिला सामना १७ नोव्हेंबरला जयपूरमध्ये होणार आहे. त्याचवेळी, दुसरा सामना रांचीमध्ये आणि तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना कोलकातामध्ये होणार आहे.
स्पोर्ट्सकीडाच्या वृत्तानुसार, या मालिकेसाठी केएल राहुलला भारतीय संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले जाऊ शकते. वास्तविक, टी-२० विश्वचषक खेळणाऱ्या बहुतेक खेळाडूंना या मालिकेसाठी विश्रांती दिली जाईल आणि त्यामुळे केएल राहुल कर्णधार बनू शकतो.
हेही वाचा – विराट कोहलीच्या १० वर्षीय मुलीला धमक्या, दिल्ली महिला आयोगानं उचललं ‘हे’ पाऊल!
बीसीसीआयशी संबंधित एका सूत्राने एएनआयशी केलेल्या संभाषणात केएल राहुलच्या कर्णधारपदाचा खुलासा केला. तो म्हणाला, “वरिष्ठ खेळाडूंना विश्वचषकानंतर विश्रांतीची आवश्यकता असेल आणि केएल राहुल हा भारतीय टी-२० संघाचा महत्त्वाचा भाग आहे. तो संघाचे नेतृत्व करणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. विराट कोहलीनंतर भारतीय संघाचा पुढील कर्णधार निवडण्यासाठी भारतीय निवड समिती येत्या काही दिवसांत बैठक घेणार आहे.”
टी-२० मालिकेदरम्यान, ईडन गार्डन्सवरील सामना पाहण्यासाठी ७० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये येण्याची परवानगी असेल. ईडन गार्डनची क्षमता प्रचंड आहे. केवळ ७० टक्के प्रेक्षक येऊ दिले, तर सुमारे ५० हजार प्रेक्षक मैदानात येऊ शकतात. कोणत्याही क्रिकेट सामन्यासाठी हा मोठा आकडा म्हणता येईल.