KL Rahul Finisher: रविवारी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ४ विकेट्सने पराभव करून तिसऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले. या विजयासह भारताने १२ वर्षांनी पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरले. दरम्यान या सामन्यात न्यूझीलंडच्या २५१ धावांचा पाठलाग करताना कर्णधार रोहित शर्माने भारताकडून सर्वाधिक ७६ धावा केल्या. त्यांनंतर मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर आणि केएल राहुलने नाबाद ३४ तर रवींद्र जडेजाने ९ धावा करत विजयी फटका मारला.
दरम्यान यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने भारताच्या या विजयात महत्त्वाची खेळी तर केलीच आहे. पण यापूर्वीही त्याने आयसीसी स्पर्धांच्या बाद फेरीच्या सामन्यात अनेकवेळा दमदार खेळी करत भारताला विजय मिळवून दिला आहे.
टीम इंडियाचा नवा फिनिशर
२०२३ मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध राहुलने २० चेंडूत नाबात ३९ धावा केल्या होत्या. त्यानंतर या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ३४ चेंडूत ४२ धावांची खेळी केली होती. तर आजच्या सामन्यात वरची फळी ढासळल्यानंतर ३३ चेंडूत नाबाद ३४ धावा करत भारताला विजय मिळवून दिला. या आकडेवारीवरून असे दिसून येते की गेल्या काही वर्षांत राहुल भारताचा नवा फिनिशर म्हणून उदयास आला आहे.
न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनरने नानेफक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्यानंतर न्यूझीलंडने भारताला २५२ धावांचे लक्ष्य दिले. कर्णधार रोहित शर्माच्या ७६ धावा, शुभमन गिल व विराट कोहली बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यरच्या ४८ धावा आणि शेवटी राहुलच्या विजयी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
भारत चॅम्पियन
भारतीय संघाचा चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा सलग तिसरा अंतिम सामना होता. याआधी २०१३ मध्ये भारताने इंग्लंडला हरवून ट्रॉफी जिंकली होती, परंतु २०१७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला होता. आता भारताने न्यूझीलंडला पराभूत करत चॅम्पियन्स ट्रॉफी तिनदा जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. टीम इंडियाने २००२ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे संयुक्त विजेतेपद जिंकले होते. याशिवाय ऑस्ट्रेलियाने दोनदा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.
या सामन्यात भारताने प्रथम गोलंदाजी करत न्यूझीलंडला २५१/७ धावांवर रोखले. भारतीय गोलंदाजांनी, विशेषतः फिरकीपटू कुलदीप यादव (२/४०) आणि वरुण चक्रवर्ती (२/४५) यांनी या अंतिम सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली. न्यूझीलंडकडून मिचेलने १०१ चेंडूत सर्वाधिक ६३ धावा केल्या, तर मायकेल ब्रेसवेल, रचिन रवींद्र आणि ग्लेन फिलिप्स यांनी अनुक्रमे नाबाद ५३, ३७ आणि ३४ धावांचे योगदान दिले.