सध्याचा इंग्लंड दौरा संपल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडीज दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी काही दिवसांपूर्वी भारतीय संघाची निवड करण्यात आली. त्यामध्ये केएल राहुलच्या नावाचा समावेश करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. कारण, केएल राहुलवर दोन आठवड्यांपूर्वीच जर्मनीमध्ये शस्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे तो लगेच मैदानावर कसा येणार? असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. या प्रश्नाचे उत्तर देणारा एक व्हिडीओ समोर आला आहे.

शस्रक्रिया झाल्यानंतर काही दिवसांतच केएल राहुल मैदानावर उतरला आहे. नेट्समध्ये सराव करतानाचा त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तो पायांना पॅड बांधून फलंदाजीचा सराव करताना दिसला. म्हणजेच वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी त्याने सरावाला सुरुवात केल्याचे स्पष्ट झाले आहे. केएल राहुल वेस्ट इंडीजमध्ये खेळण्यासाठी फीट झाला तर भारतीय संघासाठी फायद्याचे ठरणार आहे.

जून महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी केएल राहुलची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, मालिका सुरू होण्यापूर्वीच तो जखमी झाला. त्यानंतर त्याला शस्त्रक्रियेसाठी परदेशात पाठवण्यात आले होते. हर्नियाच्या यशस्वी शस्त्रक्रियेनंतर त्याच्या पुनरागमनाकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा – Video : विराट कोहलीची पाणी पिण्याची नवीन स्टाईल! कॅमेऱ्यासमोर बाटली घेऊन केले असे काही…

केएल राहुल तंदुरुस्त असणे भारतासाठी खूप महत्त्वाचे आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यानंतर भारताला आशिया कप आणि टी २० विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धा खेळायच्या आहेत.

Story img Loader