चॅम्पियन्स ट्रॉफी विजयानंतर शानदार फॉर्मसह परतल्यानंतर केएल राहुलने कर्णधारपदाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. राहुलचा हा निर्णय आयपीएलच्या कर्णधारपदाशी संबंधित आहे. राहुल आयपीएल २०२५ साठी आता दिल्ली कॅपिटल्सचा संघाचा भाग असणार आहे. त्यामुळे केएल राहुल दिल्ली संघाचा कर्णधार होईल अशी सर्वांची समज होती. पण आता समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, राहुलने आयपीएल २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपदाची ऑफर नाकारली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, केएल राहुलने कर्णधारपदाची ऑफर नाकारली आणि सांगितले की एक खेळाडू म्हणून संघासाठी जास्तीत जास्त योगदान देऊ इच्छितो. केएल राहुलने कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर आता अक्षर पटेल दिल्ली फ्रँचायझीची जबाबदारी स्वीकारू शकतो, अशी चर्चा सुरू आहे. कारण, कर्णधारपदासाठीचा खरा संघर्ष या दोन खेळाडूंमध्ये होता.

आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने १४ कोटी रुपयांची बोली लावून केएल राहुलला संघात सामील केले. राहुलला यापूर्वी आयपीएलमध्ये कर्णधारपदाचा अनुभव आहे. २०२०-२१ मध्ये, तो पंजाब किंग्जचा कर्णधार होता आणि २०२२ ते २०२४ पर्यंत, तो लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार होता. त्यामुळे जेव्हा तो दिल्ली संघात दाखल झाला तेव्हा कर्णधारपदाच्या शर्यतीत त्याचे नाव आघाडीवर होते.

आता मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की राहुलची फक्त एक खेळाडू म्हणून खेळण्याची आहे. राहुल हा आयपीएलमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. २०१८ ते २०२४ या कालावधीत खेळलेल्या IPL च्या ७ पैकी ६ हंगामात त्याने ५०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.

केएल राहुलप्रमाणे अक्षर पटेलला संघाचे नेतृत्त्व करण्याचा फारसा अनुभव नाही. अक्षर पटेलने आपल्या अष्टपैलू कामगिरीने नेहमीच आपली छाप पाडली आहे. पण आता दिल्ली कॅपिटल्स त्याच्यावर ही मोठी जबाबदारी सोपवणार का यावर सर्वांच्या नजरा असणार आहेत.