KL Rahul Statement on Coffee With Karan Controversy: भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने आता २०१९ च्या ‘कॉफी विथ करण’ वादावर मौन सोडले आहे. या वादावर ते उघडपणे बोलताना त्या मुलाखतीमुळे त्याच्या जीवनावर खूप परिणाम झाल्याचे त्याने सांगितले. पाच वर्षांपूर्वी राहुल आणि सहकारी क्रिकेटपटू हार्दिक पंड्या यांनी बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहरच्या टॉक शोमध्ये अशा काही टिप्पणी केल्या ज्यामुळे देशभरात संतापाचा सामना करावा लागला होता. ‘कॉफी विथ करण’ वादाचा स्वतःवर झालेल्या परिणामाबद्दल बोलताना राहुल म्हणाला की, यामुळे तो खूप घाबरला आणि त्याच्यात खूप बदल झाला.
केएल राहुल आणि हार्दिक पंड्या कॉफी विथ करणमध्ये गेले होते. राहुल आणि हार्दिक ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होते, जेव्हा हा एपिसोड रिलीज झाला तेव्हा त्यांना मोठ्या टीकेला सामोरे जावे लागले. या एपिसोडमधील त्याच्या वक्तव्यांचा इतका खोल परिणाम झाला की त्यांनी हा दौरा अर्ध्यात सोडून भारतात परतावे लागले. ऑस्ट्रेलियाच्या वनडे मालिकेतून या दोन्ही खेळाडूंना निलंबित केले होते. राहुल नुकताच निखिल कामतच्या पोडकास्ट शोमध्ये पोहोचला होता. जिथे त्याने या वादावर वक्तव्य केले.
हेही वाचा – ENG vs SL: इंग्लंडच्या कसोटी संघात भारताच्या माजी खेळाडूचा लेक, अचानक कशी मिळाली संधी?
केएल राहुल म्हणाला, “मी ट्रोलिंगकडे फारसं लक्ष द्यायचो नाही, मला वाटायचं मला काही फरक पडत नाही. मी मुलाखतीसाठी गेलो होतो, तेव्हा मी नुकतीच सुरूवात केली होती. यानंतर मला खूप ट्रोलिंगला सामोरे जावे लागले. मी बसलो तरी ट्रोल, उभा राहिलो तरी ट्रोल व्हायचो. पुढे राहुल म्हणाला, ‘ही मुलाखत एक वेगळीच दुनिया होती. ज्यामुळे मी बदललो, मी पूर्णपणे बदललो. मी लहानपणापासूनच खूप लाजाळू आणि मृदुभाषी होतो. त्यानंतर भारताकडून खेळताना माझा आत्मविश्वास खूप वाढला. जर एका खोलीत १०० लोक असतील तर प्रत्येकजण मला ओळखेल कारण मी सर्वांशी बोलतो.”
KL Rahul ने Coffee With Karan वादावर ५ वर्षांनंतर सोडले मौन
राहुलने त्याच्यात झालेल्या बदलांबद्दल सांगताना म्हणाला, “पण मी आता नाही बोलत, कारण त्या मुलाखतीने मला खूप घाबरवले. संघातून निलंबित होणे, मला शाळेतूनही कधी निलंबित केले गेले नाही, मला शाळेत कधी शिक्षाही झाली नाही. शाळेत मी छोट्या-छोट्या खोड्या केल्या, पण मला शाळेतून काढून टाकले जाईल किंवा माझ्या पालकांना यावे लागेल असे काही केले नाही. हे सर्व माझ्या बाबतीत कधीच घडले नाही. मला या सर्व गोष्टींना कसे सामोरे जावे हे माहित नव्हते.”
केएल राहुल सध्या दुलीप ट्रॉफी २०२४ साठी तयारी करत आहे. हल्लीच त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असल्याचा इन्स्टाग्राम स्टोरीचा एक स्क्रिनशॉट व्हायरल झाला होता, जो खोटा होता.
© IE Online Media Services (P) Ltd