वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विनला भारतीय संघात स्थान मिळालं नाही. यानंतर आयपीएलमध्येही अश्विनसाठी धोक्याची घंटा वाजायला लागली आहे. मुंबई मिरर वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार, किंग्ज इलेव्हन पंजाब संघ व्यवस्थापन रविचंद्रन अश्विनला संघातून बाहेर काढण्याच्या तयारीत असल्याचं समजतंय. सध्या पंजाबचा संघ दोन-तीन संघांसोबत याविषयी चर्चा करत असून आठवड्याअखेरीस यावर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
पंजाबच्या संघ व्यवस्थापनातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ अश्विनला संघात घेण्याच्या तयारीत आहेत. राजस्थान रॉयल्स कृष्णप्पा गौथमच्या बदल्यात अश्विनला संघात जागा द्यायला तयार आहे. दिल्लीने मात्र कोणत्या खेळाडूच्या बदल्यात अश्विनला संघात स्थान मिळेलं हे स्पष्ट केलं नाहीये. २०१८ साली पंजाबच्या संघाने अश्विनवर ७.६ कोटी रुपयांची बोली लावली होती. यानंतर दोन हंगाम पंजाबचा संघ अश्विनच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये खेळला, मात्र त्यांना अपेक्षित यश मिळवता आलं नाही.
अश्विनने पंजाबकडून २८ सामन्यांमध्ये २५ बळी घेतले आहेत. २०१८ आणि १९ साली अश्विनच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ गुणतालिकेत अनुक्रमे सातव्या आणि सहाव्या स्थानावर राहिला होता. संघाच्या याच निराशाजनक कामगिरीमुळे संघमालकांनी अश्विनला संघातून मोकळं करण्याचा निर्णय घेतला असल्याचं समजतंय. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रविचंद्रन अश्विननंतर लोकेश राहुलकडे पंजाबच्या संघाचं कर्णधारपद जाऊ शकतं.