नुकताच भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका हारला. तसे असले तरी गेल्या काही महिन्यात टीम इंडियाने सर्व स्तरावर चांगली कामगिरी केली आहे. गेल्या वर्षभरात भारताने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली केवळ एकच एकदिवसीय मालिका गमावली आहे. पण या सर्व गोष्टींमध्ये चौथ्या क्रमांकावर एखादा विश्वसनीय फलंदाज अद्यापही संघ व्यवस्थापनही सापडलेला नाही.
गेल्या काही दिवसांपासून या चर्चेला उधाण आले आहे. आतपर्यंत संघ व्यवस्थापनाने अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, दिनेश कार्तिक, मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर या खेळाडूंना संधी दिली आहे. पण तरीही संघ व्यवस्थापन अजून प्रयोग करत असल्याचे दिसत आहे. यावर माजी कर्णधार सौरव गांगुली याने जाब विचारला असून लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकावर खेळू द्यावे, असे सुचवले आहे. परंतु, प्रसिद्ध समालोचक हर्ष भोगले यांनी गांगुलीचे हे म्हणणे खोडून काढत धोनी हाच चौथ्या क्रमांकासाठी सर्वोत्तम पर्याय असल्याचे म्हंटले आहे.
टीम इंडिया या दौऱ्यासाठी एक बलाढ्य संघ म्हणून मैदानात उतरला होता. हा संघ समतोल असल्याचे दिसत होते. फक्त चौथ्या क्रमांकावर कोण खेळाडू खेळेल हाच प्रश्न होता. भारताने युवराज, रहाणे, मनीष पांडे आणि इतर अनेक खेळाडूंना या क्रमांकावर खेळवून पाहिले. त्यानंतर अखेर दिनेश कार्तिक आणि लोकेश राहुलला संधी देण्यात आली. पण माझ्या मते धोनी हाच योग्य पर्याय आहे. धोनी हा खूप मोठा आणि महान खेळाडू आहे. त्याचा संघ व्यवस्थापनाने नीट उपयोग करून घेणे गरजेचे आहे, असे तो म्हणाला.