Yashasvi Jaiswal KL Rahul Highest Partnership: पर्थ कसोटीतील पहिल्या डावात १५० धावांवर सर्वबाद झालेल्या भारतीय संघाने दुसऱ्या डावात सलामीवीरांच्या फटकेबाजीच्या जोरावर एकही विकेट न गमावता १९७ धावा केल्या आहेत. पर्थमधील ऑप्टस स्टेडियमवर सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी १७ विकेट पडल्या. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया पहिल्या डावात अवघ्या १५० धावांत गारद झाली. यानंतर कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली भारतीय वेगवान गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत दुसऱ्या दिवशी पहिल्याच सत्रात ऑस्ट्रेलियाचा डाव १०४ धावांत गुंडाळला. यानंतर दुसऱ्या डावाची सुरूवातही भारताने जबरदस्त केली आणि जुना विक्रम मोडीत काढला आहे.
भारताच्या सलामी जोडीची उत्कृष्ट फलंदाजी
पर्थ कसोटीच्या दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वालने शानदार शतक झळकावले. यासह यशस्वी आणि केएल राहुल यांनी २०१ धावांची भागीदारी केली. ऑस्ट्रेलियात भारतासाठी पहिल्या विकेटसाठीची ही सर्वोच्च भागीदारी आहे. याआधी कोणत्याही भारतीय सलामी जोडीने २०० धावांचा टप्पा ओलांडला नव्हता. राहुल-यशस्वीच्या जोडीने हा पराक्रम केला आहे. यापूर्वी १९८६ मध्ये सुनील गावस्कर आणि के श्रीकांत यांनी भारताच्या पहिल्या विकेटसाठी १९१ धावांची भागीदारी केली होती. यानंतर आता तब्बल ३८ वर्षांनंतर या दोन्ही फलंदाजांनी हा विक्रम मोडीत काढत नवा विक्रम आपल्या नावावर केला.
भारतीय सलामी जोडीची ऑस्ट्रेलियात सर्वात मोठी भागीदारी
२०१ धावा – यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ( पर्थ, २०२४)
१९१ धावा- सुनील गावस्कर आणि क्रिस श्रीकांत (सिडनी, १९८६)
१६५ धावा- सुनील गावस्कर आणि चेतन चौहान (मेलबर्न, १९८१)
१४१ धावा – आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग (मेलबर्न, २००३)
१२४ धावा- विनू मांकड आणि चंदू सरवटे (मेलबर्न, १९४८)*
१२३ धावा – आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग (२००४)
तत्त्पूर्वी दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत जैस्वाल आणि केएल राहुलने मिळून टीम इंडियाची धावसंख्या ४७ षटकांत दुसऱ्या डावात १२६ धावांपर्यंत नेली. यासह टीम इंडियाच्या सलामीच्या जोडीने ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर ७६ वर्षांनंतर १०० अधिक धावांची भागीदारी केली होती.
हेही वाचा – IND vs AUS: यशस्वी जैस्वालचा विश्वविक्रम, कसोटीत एका कॅलेंडर वर्षात ‘ही’ कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज
यशस्वी जैस्वालचे ऑस्ट्रेलियामध्ये ऐतिहासिक शतक
टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालने या सामन्यात २०५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. त्याने षटकारासह आपले शतक पूर्ण केले. या सामन्यात केएल राहुलने यशस्वी जैस्वालला चांगली साथ दिली. केएल राहुलच्या बचावत्मक फलंदाजीमुळे यशस्वीलाही धीर मिळाला आणि त्यानेही सावध फलंदाजीने सुरूवात करत नंतर आपला विस्फोटक अंदाज दाखवत शतक पूर्ण केले. राहुललाही शतक करण्याची मोठी संधी होती परंतु तो ७७ धावांवर बाद झाला. या सामन्यात केएल राहुलला मिचेल स्टार्कने बाद केले आणि दोन्ही फलंदाजांमधील ही ऐतिहासिक भागीदारी तुटली.