भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर फक्त एक कसोटी सामना जिंकला. एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत भारताला पराभवाचा सामना करावा लागला. एकदिवसीय मालिकेत केएल राहुलने टीम इंडियाची कमान सांभाळली होती, पण तिन्ही सामन्यात भारताचा पराभव झाला. या मालिकेनंतर राहुलने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
रविवारी एकदिवसीय मालिकेतील तिसर्या आणि शेवटच्या सामन्यात भारताचा ४ धावांनी पराभव झाला. राहुल पहिला भारतीय कर्णधार बनला, ज्याच्या नेतृत्वाखाली संघाला मालिकेतील तीनही एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. सोमवारी राहुलने सोशल मीडियावर संघासोबतचा एक फोटो शेअर केला.
राहुलने कॅप्शनमध्ये लिहिले, ”कठीण प्रवास तुम्हाला अधिक चांगले आणि मजबूत बनवण्यात मदत करतो. परिणाम कदाचित आमच्यासाठी अनुकूल नसतील, परंतु आम्ही आमच्या चुकांमधून शिकू. देशाचे नेतृत्व करणे हा अत्यंत सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण होता, जो शब्दात व्यक्त करता येणार नाही. काम कधीही थांबत नाही, कारण आपण चांगले होण्यावर लक्ष केंद्रित करतो आणि कधीही हार मानू नका. तुमच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार.”
हेही वाचा – IND vs SA : वनडे मालिका जिंकल्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूनं म्हटलं ‘जय श्री राम’!
बॉलिवूड अभिनेत्री आणि राहुलची गर्लफ्रेंड अथिया शेट्टीनेही या पोस्टवर कमेंट करत हार्ट इमोजी शेअर केला आहे. एकदिवसीय मालिकेत राहुलची बॅट शांत होती. पार्लमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याला फक्त १२ धावा करता आल्या, तर केपटाऊनमधील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याच्या बॅटमधून फक्त ९ धावा आल्या. पार्लमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने अर्धशतक झळकावले आणि ५५ धावांचे योगदान दिले.