विश्वचषक स्पर्धेआधीच टीम इंडियाच्या गोलंदाजी बुरूजाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे भारताचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा विश्वचषक स्पर्धेला मुकण्याची शक्यता आहे. नुकत्याच इंग्लंडविरोधात झालेल्या एकदिवसीय सामन्यात इशांतच्या जागी मोहित शर्माचा संघात समावेश करण्यात आला होता तर, तिरंगी मालिकेसाठी निवड करण्यात आलेल्या धवल कुलकर्णीला माघारी न बोलावता विश्वचषकासाठी राखीव गोलंदाज म्हणून त्याचा विचार केला जात आहे. विश्वचषकात कठीण क्षणी गोलंदाजाची निकड भासल्यास राखीव गोलंदाज संघाकडे असावा यासाठी बीसीसीआयचे विचारमंथन सुरू आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱयात मेलबर्न कसोटी सामन्यात इशांतच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. इशांत सिडनी कसोटीत देखील खेळू शकला नव्हता. परंतु, एकदिवसीय मालिकेसाठीच्या प्रशिक्षण सत्रात इशांत सामील झाला होता. त्यानंतर सिडनी क्रिकेट स्टेडियमवरील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात इशांतचा संघात समावेश देखील करण्यात आला परंतु, पावसाच्या व्यत्ययामुळे सामना रद्द झाला झाला आणि इशांत मैदानात येण्याचीही संधी मिळाली नाही. संघातील खेळाडूंच्या दुखापतीबद्दल माहिती देताना कर्णधार धोनीने पत्रकार परिषदेत रोहित शर्मा वगळता इतर सर्व फिट असल्याचे सांगितले होते. परंतु, शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध झालेल्या महत्त्वाच्या सामन्यात इशांतला आराम देण्यात आला. यातून इशांतच्या दुखापतीने पुन्हा डोके वर काढल्याचे स्पष्ट झाले. यावर धोनीनेही स्पष्टीकरण देताना, इशांतला सराव करताना तुम्ही सर्वांनी पाहिले आहे. तो अगदी फिट होता परंतु, सरावादरम्यान इशांतची गुडघ्याची दुखापत पुन्हा समोर आली. तरीही चिंता करण्याचे कारण नसून पुढील चार दिवसांत इशांत दुखापतीतून सावरेल असा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला असल्याचे धोनीने पत्रकारपरिषदेत सांगितले आहे.