India vs Bangladesh semi final match live streaming: १९वी आशियाई क्रीडा स्पर्धा चीनच्या हांगझोऊ येथे खेळली जात आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. आता आशियाई क्रिकेटचा उपांत्य सामना भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात होणार आहे. हा सामना ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसहा वाजता होणार आहे. या सामन्याची नाणेफेक ६ वाजता होणार आहे. यासाठी भारतीय संघाने जोरदार तयारी केली आहे. हा सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश करण्याचा भारताचा प्रयत्न असेल.
दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात होणार आहे. या दोन्ही सामन्यातील विजयी संघ ७ ऑक्टोबर रोजी खेळल्या जाणाऱ्या अंतिम फेरीत आमनेसामने येतील. त्याच वेळी, उपांत्य फेरीच्या सामन्यात पराभूत झालेले दोन्ही संघ कांस्यपदकासाठी ७ ऑक्टोबर रोजी आमनेसामने असतील.
उपांत्यपूर्व फेरीत भारताने दाखवून दिली ताकद –
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना हांगझोऊ, चीनमधील पिंगफेंग कॅम्पस क्रिकेट फील्ड येथे होणार आहे. हा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. याआधी भारताने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळचा २३ धावांनी पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. या सामन्यात सलामीवीर यशस्वी जैस्वालने शतक झळकावले होते. त्याचवेळी रिंकू सिंगनेही अवघ्या १५ चेंडूत ३७ धावांची खेळी केली होती.
लाइव्ह सामना कुठे पाहता येणार –
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना हिंदीमध्ये पाहायचा असेल, तर तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्क चॅनलवर सोनी स्पोर्ट्स टेन ३, सोनी स्पोर्ट्स टेन ४ वरील तमिळ आणि तेलुगू कॉमेंट्री, सोनी स्पोर्ट्स टेन ३ एचडी आणि सोनी स्पोर्ट्स टेन ४ एचडी वरील चॅनेलवर हिंदी समालोचनेसह पाहू शकता. त्याचबरोबर इंग्रजी समालोचनमध्ये पाहायचे असेल, तर तुम्ही ते सोनी स्पोर्ट्स टेन ५ आणि सोनी स्पोर्ट्स टेन ५ एचडीवर पाहू शकता. त्याचबरोबर जर तुम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्मवर सामना पाहायचा असेल, तर तुम्ही सोनी लीव्ह अॅपवर सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.
भारतीय संघ: ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग (यष्टिरक्षक), आकाशदीप सिंग.
बांगलादेशचा संघ: झाकीर अली (यष्टीरक्षक), महमुदुल हसन जॉय, मोसाद्देक हुसेन, परवेझ हुसेन आमोन, सैफ हसन (कर्णधार), शहादत हुसेन, यासिर अली, झाकीर हसन, रिपन मंडल, मृत्युंजय चौधरी, रकीबुल हसन, रिशाद होसेन, सुमन खान, सुमन खान, तनवीर इस्लाम, अफिफ हुसेन.