जालन्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत बुलडाण्याच्या बाला रफिक शेखने अभिजीत काटकेवर मात करत स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. या बातमीनंतर पुण्याच्या वडगाव बुद्रुक येथील हनुमान आखाड्यात बाला रफिकच्या सहकाऱ्यांनी आणि प्रशिक्षकांनी जल्लोष केला. गणपतराव आंधळकर यांच्याकडून कुस्तीचे धडे गिरवणाऱ्या बाला रफिकने नंतर वस्ताद गणेश दांगट यांच्याकडून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. मात्र जालन्यासारख्या दुर्गम भागातून आलेल्या बाला रफिकला या पदापर्यंत पोहचेपर्यंत प्रचंड मेहनत घ्यावी लागली आहे. पुण्याच्या प्रसिद्ध पर्वती या ठिकाणाचा बालाच्या महाराष्ट्र केसरी बनण्यामध्ये मोठा वाटा असल्याचंही त्याचे वस्ताद गणेश दांगट यांनी लोकसत्ता.कॉमशी बोलताना सांगितलं.
ज्यावेळी बाला रफिक पहिल्यांदा हनुमान आखाड्यात आला त्यावेळी त्याच्या पायांमध्ये फारशी ताकद नव्हती. त्याची तंदुरुस्ती वाढावी यासाठी वस्ताद गणेश दांगट यांनी जुना उपाय शोधून काढला. जुन्या काळी पुण्यातले पैलवान आपली तंदुरुस्ती वाढवण्यासाठी पर्वतीवर चढ-उतार करायचे. बाला रफिकसाठीही दांगट यांनी हाच कार्यक्रम आखला. सुरुवातीच्या काही दिवसांमध्ये बाला अवघ्या 5-10 पायऱ्या चढल्यानंतर थकून जायचा. मात्र यानंतर कठोर मेहनत घेऊन बालाने आपली शाररिक ताकद वाढवली. यानंतर 2-3 लहान मुलांना आपल्या कमरेवर किंवा पाठीवर बसवून बाला पर्वती 10-15 वेळा चढायला आणि उतरायला लागला. यानंतर बालाच्या खेळात सुधारणा होत गेली. लोकसत्ता.कॉमशी बोलत असताना दांगट यांनी बालाच्या दिनचर्येबद्दल माहिती दिली.
बाला रफिक हा मुळचा मातीतला खेळाडू आहे. त्यामुळे मॅटवर तो अभिजीतचा सामना कसा करेल याबद्दल प्रत्येकाच्या मनात धाकधूक होती. मात्र बालाच्या खेळात प्रामाणिकपणा होता, त्याने वेळोवेळी नवे डावपेच शिकून घेण्याकडे भर दिला आणि याचा फायदा त्याला अंतिम सामन्यात झाल्याचं दांगट म्हणाले. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला असला तरीही यावर समाधान न मानता आगामी हिंदकेसरी व राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये बाला रफिकला उतरवण्याचं आपलं उद्दीष्ट असल्याचं दांगट म्हणाले.