इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. आपल्या पहिल्याच हंगामामध्ये थेट अंतिम सामन्यात धडक मारलेल्या गुजरात टायटन्सची लढत राजस्थान रॉयल्ससोबत होणार आहे. आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर या स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. गुजरातच्या अहमदाबाद शहरामध्ये असलेले हे स्टेडियम जगातील सर्वात मोठे क्रिकेट मैदान आहे. या ठिकाणी १ लाख ३२ हजार प्रेक्षक बसू शकतात. आज होणाऱ्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात हे मैदान खचाखच भरण्याची दाट शक्यता आहे.
१९८३मध्ये बांधण्यात आलेले हे स्टेडियम सरदार वल्लभभाई पटेल किंवा मोटेरा या नावांनी ओळखले जाते होते. पण, गेल्या वर्षी त्याचे नूतनीकरण करून त्याचे जगातील सर्वात अत्याधुनिक आणि सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये रुपांतर करण्यात आले. शिवाय नूतनीकरणानंतर त्याचे नाव बदलून त्याला विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव देण्यात आले. एकूण ६३ एकर परिसरामध्ये पसरलेल्या या संकुलामध्ये रेस्टॉरंट, ऑलिम्पिक आकाराचा जलतरण तलाव, व्यायामशाळा, पार्टी एरिया, थ्रीडी प्रोजेक्टर थिएटर, टीव्ही रूम, चार ड्रेसिंग रूम आणि फ्लड एलईडी दिवेही बसवण्यात आलेले आहेत.
नरेंद्र मोदी स्टेडियमच्या वैशिष्ट्याबद्दल बोलायचे झाल्यास, याठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या ११ खेळपट्ट्या आहेत. त्यापैकी पाच लाल मातीच्या तर सहा काळ्या मातीच्या आहेत. मुख्य स्टेडियमशिवाय या ठिकाणी दोन सराव मैदानेही बांधण्यात आलेले आहेत. तिथेही नऊ खेळपट्ट्या बनवण्यात आल्या आहेत जेणेकरून एकाच वेळी चार ते पाच संघ आरामात एकत्र सराव करू शकतील. सर्वात महत्त्वाचे म्हणचे जर पावसामुळे सामना विस्कळीत झाला तर पाऊस थांबल्यानंतर केवळ अर्ध्या तासात हे मैदान कोरडे होऊन खेळण्यायोग्य होते.
या स्टेडियमची रचना अमेरिकेतील पॉप्युलस या कंपनीने तयार केलेली आहे. याच कंपनीने ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट स्टेडियमची रचनाही केली होती. नरेंद्र मोदी स्टेडियमचे बांधकाम लार्सन आणि ट्युब्रो या कंपनीला देण्यात आले होते. या स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी ७०० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. त्याच्या बांधकामामध्ये एक लाख मेट्रिक टन लोखंड आणि १४ हजार मेट्रिक टन स्टीलचा वापर करण्यात आला आहे. हे प्रमाण पॅरिसमधील आयफेल टॉवरपेक्षा १० पटींनी जास्त आहे.
अशा भव्यदिव्य आणि अत्याधुनिक सोयीसुविधा असलेल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएल २०२२ स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.