Reason Behind Team India Defeat : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी झाली आहे. मुंबईत वानखेडे स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला होता. पण काल रविवारी झालेल्या दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर एकतर्फी विजय मिळवला. विशाखापट्टणम येथे झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने १० विकेट्स राखून भारताचा लाजीरवाणा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढं भारताचा आख्खा संघ ११७ धावांवर गारद झाला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचे समालीवीर फलंदाज ट्रेविस हेड आणि मिचेल मार्शने भारतीय गोलंदाजांचा धुव्वा उडवत नाबाद अर्धशतक ठोकले. भारताचा सर्वात मोठा पराभव झाल्याने क्रिकेटप्रेमींनी सोशल मीडियावर तीव्र नाराजी व्यक्त केलीय. भारताच्या मोठा पराभव होण्यामागे नेमकी कोणती कारणे आहेत, याबाबत जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
शुबमन गिल : टीम इंडियाला दोन्ही सामन्यांमध्ये चांगली सुरुवात मिळाली नाही. पहिल्या एकदिवसीय सामन्यात शुबमन गिलने फक्त २० धावा केल्या. तर दुसऱ्या वनडेत शुबमनला खातंही उघडता आलं नाही. ऑस्ट्रेलियासारख्या मजबूत संघासमोर चांगली सुरुवात होणे आवश्यक असतं. पण शुबमन गिलने पुन्हा एकदा निराशाजनक कामगिरी केली. दुसऱ्या सामन्यात शुबमन बाद झाल्यानंतर टीम इंडियाच्या फलंदाज एका पाठोपाठ एक बाद होत गेले.
सूर्यकुमार यादव : टी २० चा सुपरस्टार फलंदाज सूर्यकुमार यादव वनेड फॉरमॅटमध्ये धावांसाठी संघर्ष करताना दिसत आहे. सूर्यकुमार खराब फॉर्ममधून जात असल्याने त्याच्यावर सोशल मीडियावर टीका केली जात आहे. सूर्यकुमार यादव दोन्ही सामन्यात गोल्डन डकचा शिकार झाला. म्हणजेच तो त्याच्या इनिंगमध्ये पहिल्या चेंडूवरच बाद झाला. सूर्यकुमार दोन्ही सामन्यांमध्ये भोपळाही फोडू शकला नाही. अशा परिस्थितीत आता सूर्यकुमारच्या जागेवर अन्य खेळाडूला संधी देण्याची मागणी केली जात आहे.
मिडल ऑर्डर फ्लॉप : भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली नव्हती. पण मिडल ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप ठरला. सूर्यानंतर हार्दिक पांड्या, के एल राहुल यांनाही धावांचा सूर गवसला नाही. सूर्यकुमार यादव (0), हार्दिक पांड्या (१) आणि के एल राहुलने अवघ्या ९ धावा केल्या. पाच षटकांमध्येच तिन्ही फलंदाज स्वस्तात माघारी परतले. त्यावेळी भारताची धावसंख्या ४९-५ अशी झाली होती.
गोलंदाजांची खराब कामगिरी : भारतीय फलंदाजांनी फक्त ११७ धावा केल्या होत्या. अशा परिस्थितीत गोलंदाजांकडून जास्त अपेक्षा ठेवणं कठीण होतं. पण ऑस्ट्रेलियाने ज्याप्रकारे ११ षटकांमध्येच ११८ धावांचं लक्ष्य गाठलं, ते पाहून भारतीय गोलंदाजांनाही आश्चर्य वाटलं असेल. या सामन्यात सिराजने २ षटकात ३७, हार्दिकने एका षटकात १८, कुलदीप यादवने एका षटकात १२ धावा दिल्या.
वनडेत भारताचा सर्वात मोठा पराभव (चेंडूच्या अनुषंगाने)
१) ऑस्ट्रेलिया (२०२३), २३४ चेंडू
२) न्यूझीलंड, (२०१९), २१२ चेंडू
३) श्रीलंका, (२०१०), २०९ चेंडू