मोहाली कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात विराट कोहलीने स्लिपमध्ये काही सोपे झेल सोडले. मात्र स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण कसे करावे या संदर्भात कोहलीला ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज मॅथ्यू हेडनने टिप्स दिल्या. वीरेंद्र सेहवागला डच्चू मिळाल्यामुळे कोहलीला पॉइंटऐवजी स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करावे लागले.
स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करताना शेवटच्या क्षणापर्यंत गोलंदाज आणि चेंडू या दोघांकडे लक्ष ठेवण्याचा सल्ला हेडनने कोहलीला दिला. तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी कोहलीने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक ट्रेव्हर पेनीच्या यांच्या मार्गदर्शनाखाली स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणाचा कसून सराव केला. या सत्रानंतर हेडनने कोहलीला मार्गदर्शन केले.
विविध खेळाडू विविध पद्धतीने स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण करतात. पण जे खेळाडू स्लिपमधील क्षेत्ररक्षणात नाव कमावतात, ते त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवर नियंत्रण मिळवतात असे हेडनने सांगितले. मार्क वॉ, मार्क टेलर, मोहम्मद अझरुद्दीन, राहुल द्रविड यांचे स्लिपमधील क्षेत्ररक्षण बघताना ही गोष्ट खूप सोपी आहे असे वाटते, पण तसे नक्कीच नाही असे त्याने पुढे सांगितले.
कारकीर्दीत स्लिपमध्ये क्षेत्ररक्षणात माहीर असलेल्या हेडनचा सल्ला कोहलीने मनावर घेतल्यास भारतीय संघाला त्याचा फायदा होऊ शकतो.

Story img Loader