एकदिवसीय क्रिकेटमध्ये विराट कोहली नियमितपणे शतके ठोकत आहे, हे पाहून भारताचा माजी कप्तान सुनील गावस्कर भारावला आहे. सचिन तेंडुलकरचा एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांचा विक्रम कोहलीच मोडीत काढू शकेल, असे मत गावस्करने व्यक्त केले आहे.
कोहलीने ११२ एकदिवसीय सामन्यात भारताचे प्रतिनिधित्व केले असून, यात त्याने १७ शतकांच्या साहाय्याने ४९१९ धावा केल्या आहेत. सचिनने इतक्याच सामन्यांमध्ये आठ शतकांनिशी ४००१ धावा केल्या होत्या. कोहली ज्या पद्धतीने शतके झळकावत आहे, ते पाहता तो सचिनचा ४९ एकदिवसीय शतकांचा विक्रम मोडू शकेल, असे गावस्करने म्हटले आहे.
‘‘विक्रम हे मोडण्यासाठीच असतात. परंतु सचिनचे काही विक्रम हे मोडणे केवळ अशक्यप्राय आहे. २०० कसोटी सामने खेळणे आणि त्यात ५१ शतके झळकावणे, या विक्रमापर्यंत पोहोचणे कठीण आहे,’’ असे गावस्कर यांनी सांगितले.
‘‘एकदिवसीय क्रिकेटमध्ये कोहली ज्या रितीने खेळतो आहे, ते पाहता सचिनचा ४९ शतकांचा विक्रम मोडणे त्याला शक्य होईल. कोहलीला आता ३२ आणखी शतकांची आवश्यकता आहे. येत्या हंगामातच कोहलीच्या खात्यावर २० किंवा २२ शतके जमा असतील,’’ असे गावस्करने सांगितले.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सात एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरू आहे. या १५ दिवसांमध्येच कोहलीने दोन शतके झळकावली आहेत. त्यामुळेच भारताला मालिकेत २-२ अशी आघाडी टिकवता आली आहे. १६ ऑक्टोबरला कोहलीने फक्त ५२ चेंडूंत शतक साकारले. भारताकडून हे दुसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक होते. मग बुधवारी नागपूरात त्याने ६१ चेंडूंत शतक केले. हे तिसऱ्या क्रमांकाचे वेगवान शतक ठरले.