माजी क्रिकेटपटू मिचेल जॉन्सनची टीका
भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका
भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या वर्तणुकीवर ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सन यांनी कडाडून टीका केली आहे. कोहली हा मूर्ख आणि असभ्य आहे, अशा शब्दांत त्यांनी ताशेरे ओढले आहेत.
दुसऱ्या कसोटीत कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टिम पेन यांच्यात वारंवार खडाजंगी झाली. पण पंच ख्रिस गॅफानी यांनी तंबी दिल्यामुळे दोघे शांत झाले. मात्र कसोटी सामना संपल्यानंतर वादात कोणत्याही मर्यादांचे उल्लंघन झाले नाही, अशी ग्वाही दोन्ही कर्णधारांनी दिली.
‘‘सामन्याच्या अखेरीस हस्तांदोलन करताना ‘छान लढत झाली’ हे वाक्य म्हणताना एकमेकांच्या डोळ्यांकडे पाहण्याची धमक हवी. सामन्यानंतर पेनशी भेटताना कोहलीला हे करता आले नाही. माझ्या दृष्टीने हेच असभ्यतेचे वर्तन आहे,’’ असे जॉन्सन या वेळी म्हणाले.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मंगळवारी कोहलीची पाठराखण केली. कारण ऑस्ट्रेलियामधील दैनिकांमध्ये पेनशी झालेल्या वादाबाबत कोहलीवर टिप्पणी करण्यात आली होती.
‘‘माझ्या अनुभवातून मी हे सांगतो की, कोहलीमध्ये फारसा बदल झालेला नाही. हे अतिशय निराशाजनक आहे. त्यामुळेच तो खेळाडू म्हणून मिळवलेले मोठेपण गमावतो,’’ असे जॉन्सन यांनी सांगितले.