गेल्या काही वर्षांमध्ये क्रिकेटमधील वाढत्या व्यवसायिक दृष्टीकोनामुळे क्रिकेटचा दर्जा खालावत जात असल्याची खंत, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने बोलून दाखवली आहे. Wisden Cricket या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत विराट कोहली बोलत होता.

“मला उबग आलाय असं मी म्हणणार नाही. मात्र वर्षभराच्या कालावधीत सतत क्रिकेट खेळत असताना तुमच्याकडून अपेक्षा केल्या जातात. अशावेळी व्यवसायिक दृष्टीकोन क्रिकेटला मारक ठरतो आणि एक खेळाडू म्हणून याचा मला त्रासही होतो.” विराटने मुलाखतीमध्ये आपलं मत मांडलं.

विराट कोहली सध्या तिन्ही प्रकारांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधीत्व करतो. याचसोबत विराट आयपीएलमध्येही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा कर्णधार म्हणून खेळतो. अशावेळी आपण यापुढे क्रिकेटच्या कोणत्याही नवीन प्रकारात खेळणार नसल्याचं विराटने स्पष्ट केलं. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने स्थानिक क्रिकेटमध्ये १०० चेंडूंचा सामना असा नवीन प्रकार आणला आहे. मात्र विराटने या सामन्यांमध्ये खेळणार नसल्याचं सांगितलं. इंग्लंड दौऱ्याआधी विराट कोहली सरे क्रिकेट क्लबकडून काऊंटी क्रिकेट खेळणार होता, मात्र दुखापतीमुळे विराटला काऊंटी क्रिकेटमध्ये खेळता आलं नाही.

Story img Loader