पाकिस्तानचा माजी कर्णधार वकार युनूस याने भारताच्या आशिया चषकातल्या कामगिरीचं कौतुक केलं आहे. Khaleez Times या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत वकारने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आशिया चषकाचं विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाचं कौतुक केलं. विराट हा सध्याच्या घडीला सर्वोत्तम खेळाडू आहे, मात्र त्याच्या अनुपस्थितीत रोहित शर्माच्या संघाने केलेली कामगिरी ही नक्कीच कौतुकास्पद असल्याचं वकार म्हणाला.

अवश्य वाचा – पाकिस्तानचा संघ नक्कीच ‘कमबॅक’ करेल – वसीम अक्रम

“तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येताना विराट कोहली सामन्याचं चित्रच पालटवून ठेवतो. मात्र त्याच्या अनुपस्थितीत रोहितने आशिया चषकात भारताचं चांगलं नेतृत्व केलं. कर्णधार म्हणून मैदानात तो शांत असतो, दिवसेंदिवस कर्णधार म्हणून त्याची कामगिरी सुधारते आहे. आयपीएलमध्येही मी त्याला संघाचं नेतृत्व करताना पाहिलं आहे. तो खेळाडूंना स्वतःचे निर्णय घेण्याची मूभा देतो. त्याच्या नेतृत्वाखाली खेळाडू स्वतःच्या रणनिती आखू शकतात, एक कर्णधार म्हणून रोहितने खरचं आश्वासक प्रगती केली आहे.”

आशिया चषकात भारताला मिळालेल्या यशाचं मोठं श्रेय हे सलामीच्या फलंदाजांना द्यावं लागेल असंही वकार म्हणाला. भारताने या स्पर्धेसाठी परिपूर्ण संघ मैदानात उतरवला होता. त्यांच्याकडे सर्वोत्कृष्ट सलामीवीर आहेत. रोहित-शिखर ही जोडी वन-डे सामन्यात भारताला नेहमी आक्रमक सुरुवात करुन देते. याचसोबत आयपीएमुळे भारताच्या जलदगती गोलंदाजांच्या यादीत दिवसेंदिवस भर पडत असल्याचंही वकार म्हणाला. आशिया चषकानंतर भारतासमोर आता वेस्ट इंडिजचं आव्हान असणार आहे. ४ ऑक्टोबरपासून भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे.

अवश्य वाचा – आशिया चषकाच्या अंतिम सामन्यात झालेले हे १४ विक्रम माहिती आहेत का?

Story img Loader