नवी दिल्ली :दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या आगामी पाच ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी धावांसाठी झगडणाऱ्या विराट कोहली आणि रवींद्र जडेजाला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे.

चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीची बैठक ‘आयपीएल’च्या उत्तरार्धात होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. इंग्लंडविरुद्धच्या महत्त्वाच्या दौऱ्यासाठी कोहलीला सज्ज होता यावे, याकरिता ही विश्रांती दिली जाणार आहे. ‘आयपीएल’च्या निमित्ताने गेले दोन महिने कोहली जैव-सुरक्षा परिघात आहे. कोहली कारकीर्दीमधील सर्वात कठीण कालखंडातून जात असून, गेली तीन वर्षे त्याला शतक साकारता आलेले नाही. यंदाच्या ‘आयपीएल’ हंगामात फक्त एका अर्धशतकासह त्याला २१६ धावाच करता आल्या आहेत.

भारतीय संघ ९ ते १९ जून या कालावधीत आफ्रिकेविरुद्ध दिल्ली, कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळूरु येथे पाच ट्वेन्टी-२० सामने खेळणार आहे. त्यानंतर भारतीय संघ आर्यलड आणि इंग्लंडला जाणार आहे.

टीकाकारांकडे दुर्लक्ष -कोहली

नवी दिल्ली : टीकाकारांकडे मी दुर्लक्ष करतो. टीव्हीवरील सामनेही आवाज बंद करून पाहतो. टीका करणाऱ्यांना माझी परिस्थिती समजू शकत नाही. ते माझ्या जागी येऊ शकत नाहीत, असे मत विराट कोहलीने व्यक्त केले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ७० शतके नोंदवणारा कोहली गेली दोन-तीन वष्रे धावांसाठी झगडत आहे. ‘आयपीएल’मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाचे प्रतिनिधित्व करणारा कोहली यंदाच्या हंगामात तीन वेळा पहिल्याच चेंडूवर खातेही न उघडता बाद झाला आहे. त्यामुळे आता क्रिकेट कारकीर्दीत सर्व अनुभव घेतल्याची त्याची भावना आहे.

‘‘मी यापूर्वी एकाच हंगामात तीन वेळा पहिल्या चेंडूवर बाद झालेलो नाही. त्यामुळे गेल्या सामन्यात हैदराबादविरुद्ध बाद झाल्यानंतर माझ्याकडे हसण्यावाचून गत्यंतर नव्हते. आता बहुधा मी क्रिकेट कारकीर्दीत सर्व अनुभव घेतले आहेत,’’ असे कोहली म्हणाला.  त्याच्या निराशाजनक कामगिरीवर टीकाही केली जात आहे. मात्र, याकडे तो फारसे लक्ष देत नाही.

Story img Loader