सनरायझर्सविरुद्ध आज सामना; कोहलीच्या नेतृत्वाची पुन्हा एकदा परीक्षा
एकापेक्षा एक दर्जेदार आंतरराष्ट्रीय खेळाडूंची मांदियाळी असलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळरूचा संघ विजयी सलामी देण्यासाठी सज्ज झाला आहे. बंगळुरूचा पहिला सामना मंगळवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध रंगणार आहे. भारताच्या ट्वेन्टी-२० कर्णधारपदाची आशा असलेल्या विराट कोहलीची बंगळुरूचे नेतृत्व करताना परीक्षाच असणार आहे. कारण बंगळुरूला आतापर्यंत एकदाही जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. त्यामुळे कोहली विजयी सलामी देऊन संघाला जेतेपद पटकावून देणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल.
बंगळुरूचा संघ २००९ आणि २०११ साली स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला होता. पण दोन्ही वेळा त्यांना उपविजेत्यापदावरच समाधान मानावे लागले. नुकत्याच झालेल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात विराट स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला होता. तो चांगल्या फॉर्मात असून संघाला त्याच्याकडून मोठी अपेक्षा असेल. ख्रिस गेल, शेन वॉटसन, ए बी डि’व्हिलियर्ससारखे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तारे या संघात आहेत,
त्यांच्या कामगिरीवर साऱ्यांचे लक्ष असेल. विश्वचषकात यशस्वी ठरलेला वेस्ट इंडिजचा फिरकीपटू सॅम्युअल बद्री त्यांच्या गोलंदाजीचे मुख्य
अस्त्र असेल. वरुण आरोनसारखा वेगवान गोलंदाज बंगळुरूच्या ताफ्यात आहे.
डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबाद संघाला आतापर्यंत लक्षणीय कामगिरी करता आलेली नाही. वॉर्नर आणि शिखर धवन ही सलामीची जोडी यशस्वी ठरताना दिसलेली नाही. धवनचा फॉर्म ही संघासाठी चिंतेची बाब आहे. युवराज सिंगसारखा जिगरबाज फलंदाज या वेळी हैदराबादने आपल्या संघात घेतला असून त्याच्याकडून संघाला मोठय़ा अपेक्षा आहेत. ट्वेन्टी-२० विश्वचषकात भारताच्या गोलंदाजीचे सारथ्य करण्याबरोबर अन्य गोलंदाजांना मार्गदर्शन करणारा आशीष नेहरा हैदराबादच्या गोलंदाजीचा कणा असेल. इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गन आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन यांच्या अनुभवाचा फायदा हैदराबादच्या संघाला होऊ शकतो.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा