Asia Cup 2023: ३० ऑगस्टपासून क्रिकेट आशिया चषक स्पर्धेला सुरुवात होत आहे. टीम इंडियाने बंगळुरूमध्ये सराव सुरू केला आहे. शिबिराच्या पहिल्या दिवशी अनेक खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्यात आली. शुक्रवारी दुसऱ्या दिवशी खेळाडूंनी सराव सामना खेळला. या कार्यक्रमाचे प्रसारण हक्क असलेल्या स्टार स्पोर्ट्सने सरावाचा व्हिडीओ शेअर केला आहे.

सरावादरम्यान रोहित शर्मा आणि शुबमन गिलची जोडीने चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करत आम्ही तयार आहोत हे दाखवून दिले, दोघेही फॉर्ममध्ये दिसत होते. उमरान मलिक, राहुल चाहर यांनीही नेट गोलंदाजांमध्ये चांगला सराव केला. सरावादरम्यान राहुल द्रविडने कर्णधार रोहितसोबत खूपवेळ संवाद साधला. सराव सामन्यादरम्यान रोहित आणि गिलला मोहम्मद सिराजने क्लीनबोल्ड केले.

शुबमन गिल आणि रोहित शर्मा आक्रमक फलंदाजी करत होते. या सलामीच्या जोडीनंतर श्रेयस अय्यर आणि विराट कोहली यांनी फलंदाजी केली. कोहली आणि श्रेयस अय्यरविरुद्ध यश दयाल, मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजी केली. त्यामुळे आशिया चषकआधी भारतीय संघ कसून सराव करत आहे. दरम्यान बंगळुरूमध्ये काही प्रेक्षकांनी देखील हजेरी लावली होती. चाहत्यांनी टीम इंडियाचा उत्साह वाढवला.

टीम इंडियाने ६ तास सराव केला.

रोहित आणि गिल, कोहली आणि अय्यर, हार्दिक आणि जडेजा या जोडीने सुमारे १-१ तास फलंदाजी केली.

के.एल. राहुल बराच वेळ फलंदाजी करत आहे.

साई किशोर, कुलदीप यांनी कोहलीविरुद्ध सर्वाधिक चेंडू टाकले.

१० ते १२ नेट बॉलर्स होते.

हेही वाचा: Salman Butt: “भारत-पाकिस्तान विश्वचषकासाठी ड्रीम टीम नाहीत…”, असे का म्हणाला पाकचा माजी क्रिकेटपटू?

आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना २ सप्टेंबरला पाकिस्तानशी होणार आहे. श्रीलंकेला रवाना होण्यापूर्वी टीम इंडियाचे सराव शिबिर बंगळुरूमध्ये सुरू आहे. पहिल्या दिवशी खेळाडूंची फिटनेस चाचणी झाली. फिटनेस चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर कोहलीने सोशल मीडियावर आपला स्कोअर शेअर केला. वृत्तानुसार, बीसीसीआयने खेळाडूंना यानंतर कोणतीही गोपनीय माहिती सोशल मीडियावर शेअर करू नये असे सांगितले आहे. खेळाडू प्रशिक्षणाचे फोटो इत्यादी शेअर करू शकतात परंतु या प्रकारची माहिती नाही.

हेही वाचा: AFC League: नेयमार पहिल्यांदाच भारतीय भूमीवर खेळणार, पुण्याच्या AFC चॅम्पियन्स लीगमध्ये दिसणार स्टार फुटबॉलपटूचा जलवा!

आशिया कपसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, विराट कोहली, अक्षर पटेल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, इशान किशन (विकेटकीपर), के.एल. राहुल (विकेटकीपर), जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर.