भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने विराट कोहलीला इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेआधी एक मोलाचा सल्ला दिला आहे. “सध्या भारताची फलंदाजी चांगल्याच फॉर्मात आहे, या फलंदाजीला अधिक स्थैर्य देण्यासाठी विराटने वन-डेत चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी.” गुरुवारपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ३ वन-डे सामन्यांची मालिका सुरु होणार आहे.
२०१७ सालात जुलै-ऑगस्ट दरम्यान श्रीलंका दौऱ्यापासून भारताने आतापर्यंत ६ फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली आहे. लोकेश राहुल, केदार जाधव, मनिष पांडे, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक आणि अजिंक्य रहाणे या फलंदाजांना चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली आहे. मात्र गांगुलीच्या मते कोहली हा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सध्याच्या घडीला योग्य फलंदाज आहे. “टी-२० क्रिकेटमध्ये लोकेश राहुलने तिसऱ्या तर विराटने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी केली. या मालिकेदरम्यान भारताची फलंदाजी स्थिर दिसत होती. त्यामुळे वन-डे मालिकेतही हा प्रयोग करण्यास हरकत नाहीये.” A Century is Not Enough या आपल्या पुस्तकाचं इंग्लंडमध्ये अनावरण करत असताना सौरवने हे वक्तव्य केलं आहे.
सध्याचा भारतीय संघ हा सर्वोत्तम संघ आहे. सलामीला शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची जोडी खोऱ्याने धावा ओढते आहे. त्यामुळे हे दोन्ही खेळाडू असाच खेळ करत राहिले तर भविष्यकाळात, माझा आणि सचिनचा भागीदारीचा विक्रमही ते सहज मोडतील. मर्यादीत षटकांच्या सामन्यात रोहितचा सध्याचा फॉर्म हा खरचं वाखणण्याजोगा असल्याचं सौरव म्हणाला. त्यामुळे वन-डे मालिका सुरु होण्याआधी विराट कोहली सौरव गांगुलीचा सल्ला ऐकतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.