विश्वचषक स्पर्धेत भारताचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजला रवाना होणार आहे. ३ ऑगस्टपासून भारताच्या या विंडीज दौऱ्याला सुरुवात होणार आहे. विंडीजविरुद्ध मालिकेसाठी विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती देण्याचा निर्णय निवड समितीने घेतला होता. मात्र उपांत्य सामन्यात भारताला न्यूझीलंडकडून पराभव स्विकाराला लागला होता आणि संपूर्ण चित्र पालटलं. विंडीजविरुद्ध मालिकेत न खेळण्याचा निर्णय घेतलेल्या विराट कोहलीने आपला निर्णय बदलत, मैदानात उतरण्याचं ठरवलं. विराट कोहलीच्या या निर्णयामागचं खरं कारण आता समोर आलं आहे.

अवश्य  वाचा – कसोटी क्रमवारीत विराटने राखलं अव्वल स्थान

विश्वचषकातील पराभवानंतर भारतीय ड्रेसिंग रुममधलं वातावरण फारसं चांगलं नव्हतं. अशा परिस्थितीत भारतीय संघाने विंडीजचा दौरा करावा असं विराटचं मत नव्हतं. अशा खडतर प्रसंगी आपल्या संघाला एकटं सोडणं योग्य ठरणार नसल्याचं म्हणत विराट कोहलीने वेस्ट इंडिज दौऱ्यात खेळण्याचा निर्णय घेतला. Times Now या इंग्रजी संकेतस्थळाने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.

विश्वचषक स्पर्धेत साखळी फेरीत भारतीय संघाने चांगला खेळ केला. मात्र उपांत्य सामन्यात आघाडीचे फलंदाज झटपट माघारी परतल्यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवानंतर बीसीसीआय भारतीय संघाच्या कर्णधारपदाचं विभाजन करण्याच्या तयारीत असल्याचंही वृत्त समोर आलं होतं. मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये रोहित शर्माला कर्णधारपदाची जबाबदारी देत विराटकडे फक्त कसोटी क्रिकेटचं कर्णधारपद सोपवण्याचा बीसीसीआयचा विचार होता. मात्र या बातम्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नसल्याचं एका अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे. विंडीज दौऱ्यात भारतीय संघ ३ टी-२०, ५ वन-डे आणि २ कसोटी सामने खेळणार आहे.

Story img Loader