नागपूर : भारताचा तारांकित फलंदाज विराट कोहलीला उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे गुरुवारी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याला मुकावे लागले. त्याची दुखापत किती गंभीर आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. आगामी चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या दृष्टीने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चॅम्पियन्स करंडकात भारताचा पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध होणार आहे. जसप्रीत बुमरापाठोपाठ कोहलीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या चिंतेत भर पडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोहलीला गेल्या काही काळापासून कसोटीत धावांसाठी झगडावे लागले आहे. मात्र, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने कायमच चमकदार कामगिरी केली आहे. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ५० शतके कोहलीच्याच नावे आहेत. त्यामुळे चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धेत भारतीय संघाला यश मिळवायचे झाल्यास कोहलीची भूमिका निर्णायक ठरू शकेल.

‘‘कोहली आज खेळणार नाही. त्याच्या उजव्या गुडघ्याला दुखापत आहे,’’ असे पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या नाणेफेकीच्या वेळी भारताचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले. गुडघ्याला त्रास जाणवत असल्याने कोहलीने बुधवारी नेट्समध्ये फार वेळ सराव न केल्याची माहिती आहे. गुरुवारी, सामन्यापूर्वी त्याची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली. त्याच्या गुडघ्याला पट्टी बांधण्यात आली होती. फिजिओ कमलेश त्याच्यावर लक्ष ठेवून होते. अखेरीस हालचाल करताना मर्यादा जाणवत असल्याचे कोहलीने फिजिओंना सांगितले आणि त्याने पहिला सामना खेळणे टाळले. तो कर्णधार रोहित आणि प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी चर्चा करताना दिसला. त्यांनी कोहलीचा सामन्यात न खेळण्याचा निर्णय मान्य केला.

कटकला खेळणार?

कोहलीला बंगळूरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) उपचारांसाठी पाठवले जाणार की तो भारतीय संघाबरोबर कटक येथे जाणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना कटक (९ फेब्रुवारी) आणि तिसरा सामना अहमदाबाद (१२ फेब्रुवारी) येथे होणार आहे.