आपल्या क्रिकेटवेडय़ा मुलाच्या प्रतिभेला कोंदण देता यावे, त्याला चांगले व्यासपीठ मिळावे यासाठी त्याच्या कुटुंबियांनी कोल्हापूर सोडून मुंबई गाठली. शालेय स्पर्धातील ‘दादा’ संघ असलेल्या रिझवी स्प्रिंगफिल्डमध्ये त्यांनी त्याला प्रवेश मिळवून दिला आणि अवघ्या दोन वर्षांमध्ये ही कोल्हापूर-मुंबई ‘श्रेयांश’ एक्स्प्रेस सुसाट धावायला लागली. ही गोष्ट आहे श्रेयांश बोगरेची.  गुरुवारी वानखेडे मैदानावर झालेल्या हॅरिस शिल्ड शालेय  क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत श्रेयांशने सहा बळी मिळवत आपली छाप पाडली आणि कोल्हापुरातील सुखेनैव आयुष्य सोडून मुंबईनगरी गाठणाऱ्या पालकांचा त्याग त्याने सार्थकी लावला.

अंतिम लढतीत हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली. मात्र रिझवीने श्रेयांशच्या दमदार कामगिरीच्या बळावर हंसराज संघाचा डाव १०४ धावांतच गुंडाळला.

उत्तम उंची लाभलेल्या डावखुऱ्या वेगवान गोलंदाज श्रेयांशनेच हंसराज संघाच्या फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. रिझवी स्प्रिंगफिल्डच्या या आघाडीच्या गोलंदाजाचा ‘कोल्हापूर ते मुंबई’ प्रवास त्याच्या वडिलांनी उलगडला. ‘दोन अडीच वर्षांचा असताना लहान मुलं कार्टून वाहिन्या बघतात. पण श्रेयांश क्रिकेटचे सामने पाहत असे. हे अनेकदा होऊ लागल्यानंतर आम्हाला त्याला क्रिकेटची आवड असल्याचे समजले.  रबरी बॉलने तो घरात खेळू लागला. मात्र त्याने सिझन चेंडूवर क्रिकेटची मूलभूत कौशल्ये शिकावी असा माझा आग्रह होता. पण तीन-चार वयाच्या मुलाला सीझनवर सराव करू देण्यास प्रशिक्षक तयार नव्हते. मग मीच त्याचा प्रशिक्षक झालो. रबरी बॉल ते सीझन चेंडू हे संक्रमण अवघड होते आणि त्याने हा बदल आत्मसात केला’, असे त्याच्या वडिलांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले, ‘स्थानिक पातळीवरील स्पर्धामध्ये तो सहभागी होऊ लागला. बहुतांशी मुलांना फलंदाजच व्हायचे असते. मात्र श्रेयांशने नेहमीच गोलंदाज होण्याच्या उद्देशानेच सराव केला. मात्र कोल्हापूरमध्ये प्रगत प्रशिक्षणाची संधी नव्हती. त्याच्या प्रतिभेला पैलू पडावेत अशी आमची इच्छा होती. एकटय़ाला मुंबईत पाठवणे योग्य नव्हते कारण वय लहान होते. म्हणून आम्ही सगळ्यांनीच मुंबईत स्थलांतर होण्याचा निर्णय घेतला. श्रेयांश आठवीत असताना आम्ही मुंबईत आलो. त्याचं जग बदललं. परंतु रिझवीसारख्या शाळेत प्रवेश मिळाल्याने क्रिकेटवर लक्ष केंद्रित करता आले. दोनच वर्षांत संघाचा तो संघाचा प्रमुख गोलंदाज झाला’.

काही दिवसांपूर्वीच भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची चौथी कसोटी याच मैदानावर जिंकली होती. त्याच खेळपट्टीवर खेळण्याचा अनुभव कसा होता, यावर तो म्हणाला, ‘तो सामना टीव्हीवर पाहिला होता. मात्र तिथे खेळण्याचे दडपण नव्हते. खेळपट्टीत ओलसरपणा होता. वातावरण थंड होते, वाराही वाहत होता. या सगळ्याचा फायदा उठवत गोलंदाजी केली आणि विकेट्स मिळाल्या. गोलंदाजीत झहीर खानचा आदर्श आहे.’

श्रेयस नव्हे श्रेयांश

दिवसभर धावफलकावर प्रचलित अशा ‘श्रेयस’ नावानेच श्रेयांशची कामगिरी नोंदवण्यात आली होती. सामना संपल्यानंतर धावफलकात अंतिम गोळाबेरीज सुरू असतानाच ‘श्रेयस’ नसून ‘श्रेयांश’ नाव असल्याचे एका माध्यम प्रतिनिधीने दाखवून दिले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विकेटदिन : रिझवी स्प्रिंगफिल्ड संघाने हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचा डाव १०४ धावांतच गुंडाळला. देवज्योतिंसग चढ्ढाने सर्वाधिक २९ धावा केल्या. श्रेयांशने १५ षटकांत १८ धावा देत ६ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना रिझवी संघाचीही घसरगुंडी उडाली आणि पहिल्या दिवसअखेर त्यांची ४ बाद ५८ अशी अवस्था आहे. आर्यन सेनने २ बळी घेतले.