आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या काळात ही स्पर्धा युएईत खेळवली जाणार आहे. भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. सध्या सर्व संघ युएईत क्वारंटाइन झाले आहेत. परंतू कोलकाता नाईट रायडर्स संघासमोर स्पर्धेला सुरुवात होण्याआधी संकट निर्माण झालं आहे. युवा इंग्लिश गोलंदाज हॅरी गुर्ने आपल्या खांद्याला झालेल्या दुखापतीमुळे यंदाच्या हंगामात सहभागी होऊ शकणार नाहीये. IANS वृत्तसंस्थेने ही बातमी दिली आहे. आयपीएल प्रमाणेच हॅरी स्थानिक टी-२० स्पर्धेतही खेळणार नाहीये. पुढील महिन्यात हॅरीच्या खांद्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याचं कळतंय.
ESPNCricinfo शी बोलत असताना हॅरीने आपल्या दुखापतीच्या बातमीला दुजोरा दिला आहे. हॅरीने गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सचं प्रतिनिधीत्व केलं असून त्याच्या नावावर आयपीएलमध्ये ८ सामन्यांत ७ बळी जमा आहेत. दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखाली कोलकात्याचा संघ यंदा मैदानात उतरणार आहे. यंदाची स्पर्धा युएईत खेळवली जाणार असल्यामुळे कोलकात्याचा संघ कशी कामगिरी करतो याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
अवश्य वाचा – KKR च्या खेळाडूंची युएईत खास सोय : या अलिशान हॉटेलमध्ये राहणार…