भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी चांगलाच गोत्यात अडकलेला आहे. पत्नी हसीन जहाँने दाखल केलेल्या तक्रारीवरुन कोलकाता पोलिसांनी शमीविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद केली आहे. हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्राने यासंदर्भातलं वृत्त दिलेलं आहे. मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने कोलकात्याच्या लाल बाझार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. शमीचे इतर मुलींसोबत अनैतिक संबंध असून त्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार हसीन जहाँने केली होती. या तक्रारीवरुन पोलीसांनी शमीविरोधात ३०७, ४९८ अ, ५०६, ३२८, ३४ आणि ३७६ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
अवश्य वाचा – आमच्यात सारं काही आलबेल होतं, शमीने दाखवले पत्नीसोबत होळी खेळतानाचे फोटो
शमीविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे काही गुन्हे हे अजामिनपात्र असल्यामुळे या प्रकरणात शमीला मोठी शिक्षा होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी मोहम्मद शमीची पत्नी हसीन जहाँने, शमीचे इतर मुलींसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. आपल्या आरोपांची पुष्टी करण्यासाठी हसीनने शमीचे इतर मुलींसोबतच्या संभाषणाचे स्क्रिनशॉट आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केले होते. यानंतर पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत हसीन जहाँने, शमीचा भाऊ हसीब अहमदने आपल्यावर बलात्कार केल्याचंही म्हटलं आहे.
हसीन जहाँने केलेले सर्व आरोप मोहम्मद शमीने फेटाळून लावले होते. माझी क्रिकेट कारकिर्द संपवण्याचा हा डाव असल्याचं सांगत, आपल्यात आणि हसीनमध्ये सर्व काही आलबेल असल्याचं शमीने म्हटलं होतं. या घडामोडींनंतर बीसीसीआयने शमीचा वार्षिक करार राखून ठेवला होता. त्यामुळे या प्रकरणात आगामी काळात काय घडामोडी घडतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
अवश्य वाचा – ……तर बिनशर्त माफी मागेन, पत्नीच्या आरोपांवर मोहम्मद शमीची प्रतिक्रीया