* सामना : कोलकाता नाइट रायडर्स वि. राजस्थान रॉयल्स
* स्थळ : ईडन गार्डन्स स्टेडियम, कोलकाता
* वेळ : रात्री ८ वाजल्यापासून.
कोलकाता नाइट रायडर्सला आयपीएल जेतेपद टिकविणे मुश्कील झाले आहे. ईडन गार्डन्स स्टेडियमवर शुक्रवारी त्याची गाठ पडणार आहे ती सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या राजस्थान रॉयल्सशी. उर्वरित सहा सामन्यांत विजयाशिवाय कोलकातापुढे पर्याय नाही.
आयपीएल क्रिकेट स्पध्रेच्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्सच्या कामगिरीत गतविजेतेपदाचा रुबाब कुठेच दिसला नाही. चुकीची संघनिवड, फसणाऱ्या व्यूहरचना या सर्व पाश्र्वभूमीवर कोलकाता नाइट रायडर्सची कामगिरी खालावल्याचे प्रत्ययास येत आहे. आयपीएल स्पध्रेचा उत्तरार्ध चालू असताना दिल्ली डेअरडेव्हिल्ससारखा संघ आपली कामगिरी उंचावू लागला आहे. परंतु कोलकाता संघ आपल्या चुकांमधून काहीही शिकू शकला नाही. गौतम गंभीरचे नेतृत्वसुद्धा मैदानावर योग्य पद्धतीने जाणवत नाही.
कोलकात्याने बुधवारी दिल्लीकडून हार पत्करली. दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने एकंदर तिसरा आणि सलग दुसरा विजय नोंदवला. रायपूरला झालेल्या सामन्यात डेव्हिड वॉर्नरच्या धडाकेबाज फलंदाजीच्या बळावर दिल्लीने कोलकाताचा ७ विकेट राखून पराभव केला. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल सोडल्यास कोणतीही गोष्ट गंभीरसाठी अनुकूल ठरली नाही. गंभीर स्वत: नाहक धावचीत झाला. फक्त ५० धावांच्या मोबदल्यात कोलकाताचा अर्धा संघ तंबूत परतला होता. बाकीच्या अध्र्या संघाने प्रतिकार केल्यामुळे कोलकात्याला जेमतेम ७ बाद १३६ धावा करता आल्या.
युसूफ पठाण आणि जॅक कॅलिस पुन्हा आपले अष्टपैलुत्व सिद्ध करण्यात अपयशी ठरले. ब्रेण्डन मॅक्क्युलम आणि रयान टेन डोइश्चॅट यांना खेळविण्याची नितांत आवश्यकता आहे. मनोज तिवारीविषयी साशंकता कायम आहे.
कोलकात्याने चेन्नई सुपर किंग्जचे २०१ धावांचे आव्हान पेलताना चांगली कामगिरी सादर केली होती. परंतु फक्त १४ धावांनी त्यांच्या वाटय़ाला पराभव आला. पण दिल्लीविरुद्ध मात्र कोलकाताने सपशेल शरणागती पत्करली. कोलकाताचे क्षेत्ररक्षणसुद्धा गचाळ झाले. दोन सुरेख झेल त्यांच्याकडून सुटले. याशिवाय मनविंदर बिस्लाने डेव्हिड वॉर्नरला यष्टीचीत करण्याची नामी संधी गमावली. त्यानंतर वॉर्नरने संघाला जिंकून देणारी नाबाद ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. प्रतिस्पर्धी संघांच्या मैदानांवरील कोलकाताचा हा पाचवा पराजय ठरला.
दुसरीकडे राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सचा संघ अधिक आत्मविश्वासाने वावरत आहे. २००८ मध्ये शेन वॉर्नच्या कर्णधारपदाखाली राजस्थानने विजेतेपदाला गवसणी घातली होती. त्याची पुनरावृत्ती करण्याची क्षमता द्रविडच्या संघात दिसते आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे १७२ धावांचे आव्हान पेलताना द्रविडने १८ वर्षीय संजू सॅमसनला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठविण्याचा निर्णय घेतला. या यष्टीरक्षक-फलंदाजाने ६३ धावांची आक्रमक खेळी साकारून हा निर्णय सार्थ ठरवला आणि राजस्थानला विजय मिळवून दिला.
राजस्थानने आता ९ सामन्यांतून १२ गुण कमावले आहेत आणि आयपीएल गुणतालिकेत ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत. शेन वॉटसन जबरदस्त फॉर्मात आहे. १०१, नाबाद ९८ आणि ४१ अशा त्याच्या मागील तीन सामन्यांतील धावा आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या गुणी अष्टपैलू खेळाडूचा गोलंदाजीसाठीसुद्धा संघाला फायदा होत आहे. ब्रॅड हॉग आणि ओवेस शाहसारखे फटकेबाज फलंदाज त्यांच्याकडे आहेत. मुंबईकर फलंदाज अजिंक्य रहाणेला अजून योग्य सूर गवसलेला नाही. चालू हंगामात प्रथमच सनरायजर्स हैदराबादविरुद्ध पाच बळी घेण्याची किमया साधणाऱ्या जेम्स फॉल्कनरवर राजस्थानच्या गोलंदाजीची मदार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा