आणखी एका पराभवामुळे गतविजेता कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर फेकला गेला आहे. परंतु आयपीएलमधील महाशक्ती म्हणून ओळखला जाणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानाकडे घोडदौड करीत आहे. कोलकाता आणि चेन्नई यांच्या शनिवारी होणाऱ्या सामन्यात हीच अस्तित्वाची लढाई पाहायला मिळणार आहे.
गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाची मदार आहे ती फिरकीवर. ईडन गार्डन्सच्या घरच्या मैदानावर कोलकाताने दोन्ही लढती जिंकण्याची कर्तबगारी दाखवली आहे. परंतु मंगळवारी मोहालीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबसारख्या दुबळ्या संघानेही त्यांना धूळ चारली. त्यामुळे त्यांचा संघ खचला आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्जने गुरुवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध दणदणीत विजयाची नोंद केली. परंतु शनिवारची झुंज ही गतविजेता विरुद्ध दोन वेळा विजेत्या संघात आहे.
कोलकाता नाइट रायडर्सच्या खात्यावर पाच सामन्यांतून फक्त ४ गुण जमा आहेत. पण ईडन गार्डन्सवर सलग तिसरा विजय मिळविण्यासाठी ते आतुर आहेत. कोलकाताला युसूफ पठाण आणि मनोज तिवारीकडून फारसे योगदान मिळू शकलेले नाही. नुकताच विवाहबद्ध झालेल्या पठाणची मागील हंगामातही (१७ सामन्यांत १९४ धावा) कामगिरी समाधानकारक नव्हती. याचप्रमाणे चालू हंगामातील पाच सामन्यांतील त्याच्या धावा १८*, ०, २७, ३* आणि १३ अशा आहेत. बडोद्याच्या या अष्टपैलू खेळाडूचे संघातील स्थान डळमळीत आहे.
पंजाबविरुद्धच्या सामन्यात गंभीरने सलग तिसरे अर्धशतक नोंदवले. परंतु १५९ धावांचे आव्हान पेलताना कोलकाताला ४१ चेंडूंत ५२ धावांची आवश्यकता होती. पण त्यानंतर त्यांचे ७ फलंदाज तंबूत परतले आणि विजयाचा काटा पंजाबकडे झुकला.
अनुभवी जॅक कॅलिस मध्यमगती गोलंदाजी टिच्चून करत आहे. परंतु फलंदाजीचे सातत्य मात्र दिसून येत नाही. त्यामुळे गंभीर आणि इऑन मॉर्गन यांच्यावर फलंदाजीचा अधिक भार पडतो आहे. ब्रेण्डन मॅक्क्युलमला कोलकाताने संधी दिल्यास कॅलिस किंवा श्रीलंकेचा ऑफस्पिनर सचित्र सेनानायके यांच्यापैकी एकाला विश्रांती मिळू शकेल.
वेस्ट इंडिजचा ऑफस्पिनर सुनील नरिनच्या फिरकीला शनिवारी महेंद्रसिंग धोनीच्या ‘हॅलिकॉप्टर’चे आव्हान असेल. मायकेल हसीसुद्धा दिमाखदार फॉर्मात आहे. दिल्लविरुद्धच्या सामन्यात त्याने ५० चेंडूंत नाबाद ६५ धावांची खेळी साकारली होती. याशिवाय अष्टपैलू रवींद्र जडेजा हा चेन्नईचा हुकमी एक्का आहे. सलामीवीर मुरली विजय (५ सामन्यांत ९९ धावा) आणि मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैना (४ सामन्यांत ७८ धावा) धावांसाठी झगडताना आढळत आहेत.
हरयाणाचा वेगवान गोलंदाज मोहित शर्मा हा चेन्नईचा नवा नायक आहे. त्याने दिल्लीची आघाडीची फळी तंबूत पाठविण्याची किमया साधली होती. त्याला वेगवान गोलंदाज अॅल्बी मॉर्केलची साथ लाभेल, तर ‘सर’ जडेजा आणि आर. अश्विन चेन्नईच्या फिरकीची धुरा सांभाळतील.
सामन्याची वेळ : दुपारी ४ वाजता
अस्तित्वाची लढाई!
आणखी एका पराभवामुळे गतविजेता कोलकाता नाइट रायडर्सचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत सातव्या स्थानावर फेकला गेला आहे. परंतु आयपीएलमधील महाशक्ती म्हणून ओळखला जाणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानाकडे घोडदौड करीत आहे.
First published on: 20-04-2013 at 04:13 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolkatta knight raiders will fight against chennai super kings