जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा
भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी आणि द्रोणावल्ली हरिका यांनी काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना दुसऱ्या फेरीच्या पहिल्या डावात अनुक्रमे पोलंडची जोलांता जावाडास्का आणि जॉर्जियाची बेला खोतेनाश्विली यांच्याविरुद्ध बरोबरी पत्करली.
जागतिक महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत कोनेरू हम्पीसाठी आजचा दिवस फारच सोपा ठरला. काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना हम्पीला सुरुवातीला जोलांताने अडचणीत आणले होते. पण जोलांताचे सर्व हल्ले सहजपणे परतवून लावत हम्पीने हा डाव बरोबरीत सोडवला. पेट्रॉफ बचाव पद्धतीने खेळल्या गेलेल्या या डावात जोलांताने चांगली स्थिती निर्माण करत हम्पीवर दबाव आणला. सुरुवातीला दोघींनीही एकमेकांचे मोहरे टिपले. दोघींनीही आपापले हत्ती बाहेर काढल्यानंतर त्यांच्याकडे बरोबरी पत्करण्यावाचून कोणताच पर्याय उरला नाही. अखेर २६व्या चालीनंतर दोघींनीही बरोबरी स्वीकारली.
हरिकानेही काळ्या मोहऱ्यांनिशी खेळताना अखेरच्या क्षणी विजयासाठी निकराचे प्रयत्न केले. पण बेलाच्या भक्कम बचावापुढे हरिकाला विजय मिळवता आला नाही. बेलाने काही वेळा केलेल्या चुकांचा फायदा हरिकाला मिळाला होता. पण अखेपर्यंत लढत देऊनही हरिकाला या सामन्यात बरोबरीवर समाधान मानावे लागले. ६४ चालींनंतर ही लढत बरोबरीत सुटली.
अव्वल मानांकित आणि विद्यमान जागतिक विजेती चीनची खेळाडू जू वेनजून हिने अमेरिकेच्या इराना क्रश हिला हरवून तिसऱ्या फेरीत सहजमजल मारली. तुर्कीच्या इकतारिना अटालिक हिने दुसऱ्या फेरीत युक्रेनच्या माजी विजेत्या मारिया मुझीचूक हिला परावाचा धक्का दिला. ६४ खेळाडूंचा सहभाग असलेल्या या स्पर्धेतून ३२ खेळाडूंनी दुसरी फेरी गाठली.