कोरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी.व्ही.सिंधूने विजयी सुरुवात केली आहे. सायना नेहवालने या स्पर्धेतून माघार घेतल्यानंतर भारताकडून महिला एकेरीत सिंधू ही एकमेव खेळाडू मैदानात उतरली आहे. सिंधूने पहिल्या फेरीत हाँगकाँगच्या चेयाँग नँग यीचा २१-१३, २१-८ असा धुव्वा उडवला.
नुकत्याच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत झालेल्या अंतिम सामन्यात सिंधूने रौप्यपदकाची कमाई केली. त्यामुळे या स्पर्धेत तिच्याकडून सर्व भारतीय चांगल्या खेळाची अपेक्षा करत आहेत. सिंधूनेही आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत पहिल्या सेटमध्ये सुरुवातीला आघाडी घेतली. ६-३ अशा आघाडीवर असताना चेयाँगने सिंधूला टक्कर देत आघाडी भरुन काढण्याचा प्रयत्न केला. या आक्रमक खेळामुळे काहीस बॅकफूटवर गेलेल्या सिंधूने काही खराब फटके खेळले, याचा फायदा घेत प्रतिस्पर्धी खेळाडूने सामन्यात ८-८ अशी बरोबरी साधली. यानंतर पहिल्या सेटच्या मध्यांतरापर्यंत सिंधूकडे ११-१० अशी एका गुणाची आघाडी होती.
मात्र मध्यांतरानंतर सिंधूने सामन्याचं चित्रच पालटलं. आक्रमक फटके खेळत सिंधूने चेयाँगला हैराण करुन सोडलं. अवघ्या काही मिनीटांमध्ये सिंधूने सामन्यात ८ गुणांची आघाडी घेत, पहिला सेट २१-१३ अशा फरकाने आपल्या खिशात घातला.
दुसऱ्या सेटमध्ये मात्र सिंधूने चेयाँगला सामन्यात डोकं वर काढण्याची संधी दिली नाही. दुसऱ्या सेटमध्ये सुरुवातीला सिंधूकडे ८-४ अशी आश्वासक आघाडी होती. मध्यांतरापर्यंत सिंधूने सेटवर आपली पकड मजबूत ठेवत आपली आघाडी ११-६ अशी भक्कम केली. मध्यांतरानंतर आपल्या खेळाची गती वाढवत सिंधूने दुसरा सेट २१-८ असा जिंकत सामन्यावर आपलं नाव कोरलं. पुढच्या फेरीत सिंधूची लढत गुरुवारी थायलंडच्या निकॉन जिंदपॉलशी होणार आहे.