सर्बियापासून स्वतंत्र झालेल्या कोसोव्हो प्रांताला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) नकाशावर स्वतंत्र देश म्हणून हंगामी मान्यता मिळाली आहे. समितीच्या निर्णयामुळे कोसोव्होला २०१६च्या रिओ ऑलिम्पिकमध्ये आपला संघ पाठवता येणार आहे. सर्बियापासून विभक्त झालेल्या कोसोव्होने २००८ मध्ये स्वतंत्र राष्ट्र झाल्याची घोषणा केली होती. माँट्रेक्स, स्वित्र्झलड येथे सुरू असलेल्या आयओसीच्या कार्यकारिणी समितीच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या कार्यकारिणीने कोसोव्होला हंगामी मान्यता दिली. आता डिसेंबरमध्ये मोनॅको येथे होणाऱ्या समितीच्या सर्वसाधारण बैठकीत कोसोव्होच्या पूर्ण सदस्यत्वाचा प्रस्ताव मांडण्यात येईल. या प्रस्तावावर शिक्कामोर्तब ही निव्वळ औपचारिकता असल्याने कोसोव्हास्थित खेळाडूंना स्वतंत्र ओळख मिळणार आहे.
‘‘कोसोव्होमधील क्रीडापटूंचे हित लक्षात घेऊनच हा निर्णय घेण्यात आला आहे. राजकीय किंवा सामाजिक कारणांमुळे त्यांची कारकीर्द धोक्यात येऊ नये, यासाठीच कोसोव्होला मान्यता देण्यात आली आहे. या निर्णयामुळे २०१६ च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र होण्यासाठी होणाऱ्या विविध पात्रता स्पर्धामध्ये कोसोव्होच्या क्रीडापटूंना सहभागी होता येणार आहे,’’ असे आयओसीने आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
कोसोव्होला स्वतंत्र मान्यता देण्याच्या प्रस्तावाला सर्बियाच्या ऑलिम्पिक पदाधिकाऱ्यांनी विरोध दर्शवला होता. कोसोव्होमध्ये अल्बेनियाच्या पारंपरिक रहिवाशांचा समावेश आहे. सर्बियाच्या व्युत्पत्तीचे आणि धर्माचे उगमस्थान म्हणजे कोसोव्हो अशी सर्बियाची भूमिका आहे आणि त्यामुळेच कोसोव्होला स्वतंत्र मान्यता देण्यास त्यांनी तीव्र विरोध केला होता.
मात्र क्रीडा आणि अन्य तांत्रिक निकषांची पूर्तता केल्याने सर्बियाचा तीव्र विरोध असतानाही कोसोव्होला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ऑलिम्पिक नियमावलीनुसार देश या संज्ञेचे पालनही कोसोव्होने केले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या १९३ पैकी १०८ देशांनी कोसोव्होच्या स्वतंत्र अस्तित्वाला पाठिंबा दिला आहे. साधारणत: संयुक्त राष्ट्रांच्या अधिकृत पाठिंब्यानंतरच ऑलिम्पिक समिती नव्या देशाला स्थान देते. कोसोव्हो अद्यापही संयुक्त राष्ट्रांचे सदस्य नाही. रशिया आणि चीन या बलाढय़ देशांनी कोसोव्होला पाठिंबा दिलेला नाही.
‘‘इतिहासात प्रथमच संयुक्त राष्ट्रांची मान्यता नसलेल्या, परंतु राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीद्वारे प्रस्तावित देशाला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने मान्यता दिली आहे. आयओसीशी संलग्न होण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला किमान पाच आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटना संलग्न असणे बंधनकारक आहे,’’ अशा शब्दांत सर्बियाने आपला निषेध व्यक्त केला आहे. मात्र १९९२ मध्ये स्थापना झालेल्या कोसोव्होची ऑलिम्पिक समिती ३० विविध राष्ट्रीय क्रीडा संघटनांशी संलग्न आहे. त्यामुळे ही मान्यता देण्यात आल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, कोसोव्होची ऑलिम्पिक समिती तसेच खेळाडूंनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

Story img Loader