Krishnamachari Srikkanth Criticizes Team India : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी माजी भारतीय क्रिकेटपटू कृष्णम्माचारी श्रीकांत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत पराभवाचा सामना का करावा लागला हे श्रीकांत यांनी सांगितले. भारताला पुनरागमन करायचे असेल तर एका गोष्टीची विशेष काळजी घ्यावी लागेल, असेही श्रीकांत म्हणाले. एकीकडे श्रीकांत यांनी रोहित शर्माच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित केले आहेत, तर दुसरीकडे विराट कोहलीच्या कर्णधारपदाचे भरपूर कौतुक केले आहे.
“टी-२० आणि कसोटीत भारताचे अनाठायी कौतुक केले गेले” –
श्रीकांत यांनी आपल्या यूट्यूब चॅनलवर बोलताना भारतीय संघावर टीका केली आणि कसोटी क्रिकेटमध्ये अनाठायी कौतुक केला जाणार संघ म्हटले. अलिकडच्या काळात कसोटी संघात खेळणाऱ्या अनेक क्रिकेटपटूंनी खराब कामगिरी केली असून कुलदीप यादवसारख्या पात्र खेळाडूंना संधी मिळत नसल्याचे मत श्रीकांत यांनी मांडले. भारतीय संघाबाबत श्रीकांत म्हणाले की, “भारत एक मजबूत संघ आहे यात शंका नाही, पण टी-२० आणि कसोटीत भारताचे अनाठायी कौतुक केले गेले आहे. भारतीय संघ टी-२० आणि कसोटीत म्हणावा तितका मजबूत संघ नाही.”
हेही वाचा – विश्लेषण : शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारातून काही खेळांना वगळणे किती योग्य? किती अयोग्य? ही वेळ का आली?
श्रीकांत पुढे म्हणाले की, “भारतीय संघाचा तो काळ होता, जेव्हा विराट कोहली कसोटी संघाचा कर्णधार होता. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली, याशिवाय इंग्लंडमध्येही भारताने विजय मिळवला. हे सर्व विराट कोहलीच्या कर्णधारपदाच्या काळात घडले. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेत संघर्ष केला होता, मात्र आता सेंच्युरियन कसोटीत भारताला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे.” यावरून श्रीकांत रोहितच्या कर्णधारपदावर प्रश्न उपस्थित करत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा – IND W vs AUS W: भारतीय महिला संघाचा एकदिवसीय मालिकेत ०-३ने पराभव, नेटिझन्सने केली टीम इंडियावर जोरदार टीका
“आपण आयसीसी क्रमवारी विसरली पाहिजे” –
श्रीकांत म्हणाले की, आता भारताला आयसीसी क्रमवारी विसरण्याची वेळ आली आहे. श्रीकांतने युक्तिवाद केला की भारतातील अनेक खेळाडूंचे मूल्यमापन झाले आहे आणि दर्जेदार खेळाडू कसोटी संघातून बाहेर बसले आहेत. ते म्हणाले, “आपण आयसीसी क्रमवारी विसरली पाहिजे. कारण आपण नेहमी पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर असतो. हे अनाठायी कौतुक केलेले क्रिकेटपटू आणि त्यांच्या क्षमतेनुसार कामगिरी न केलेल्या लोकांचे संयोजन आहे. ज्यामध्ये कुलदीपसारख्या खेळाडूंना पुरेशा संधी मिळत नाहीत.” श्रीकांत म्हणाले की, भारतीय संघाने दोन्ही वेळा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायनल खेळली असली, तरी एकदाही जिंकता आलेली नाही.