आशियाई रौप्यपदक विजेत्या विकास कृष्णन (७५ किलो) व शिवा थापा (५६ किलो) यांनी जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीकडे आगेकूच केली.

माजी आशियाई विजेत्या शिवाने अल्जेरियाच्या खलील लितिमचा ३-० असा पराभव केला. त्याला आता मोरोक्कोच्या महंमद हमौतशी खेळावे लागणार आहे. विकासने हंगेरीच्या झोल्टान हार्कसावर ३-० अशी सहज मात केली. विकासने २०११मध्ये या स्पर्धेत कांस्यपदक मिळवले होते. विकासपुढे आता चौथ्या मानांकित थॉमस जब्लोनस्कीचे आव्हान असणार आहे. थॉमसने युरोपियन स्पर्धेत रौप्यपदक मिळवले आहे.

‘‘विकास व शिवा यांनी सुरेख कौशल्य दाखवले. त्यांना बलाढय़ खेळाडूंचे आव्हान असणार आहे, तरीही त्यांनी संयम ठेवत चाली केल्या तर ते विजय मिळवू शकतील,’’ असा आत्मविश्वास भारताचे राष्ट्रीय प्रशिक्षक गुरबक्षसिंग संधू यांनी व्यक्त केला.

भारताच्या मनोज कुमारला ६४ किलो गटात पराभव स्वीकारावा लागला. त्यावा चुरशीच्या लढतीत मोरोक्कोच्या अब्देल्हाके अतखानीने २-१ असे हरविले. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेत्या मनोज कुमारला या लढतीत अपेक्षेइतका सूर गवसला नाही. पहिल्या दोन फे ऱ्यांमध्ये त्याला अतखानी याच्या ठोशांवर योग्य रीतीने प्रत्युत्तर देता आले नाही.

Story img Loader