नुकतीच क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यानंतर भारतीय क्रिकेटला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली आहे. क्रिकेटपटू कृणाल पंड्याच्या घरी एका लहानग्या पाहुण्याचे आगमन झाले आहे. कृणालची पत्नी पंखुरीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. कृणालने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून ही गोड बातमी चाहत्यांना सांगितली आहे. सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याने आपल्या मुलाचे नावही उघड केले आहे.
कृणालने मुलगा आणि पत्नी पंखुरीसोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. त्याने आपल्या मुलाचे नावही ‘कविर’ असे ठेवले आहे. कृणाल आणि पंखुरीने २७ डिसेंबर २०१७ रोजी लग्नगाठ बांधली होती. पंखुरी एक मॉडेल आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना आयपीएल जेतेपद मिळवल्यानंतर कृणालने तिला लग्नाची मागणी घातली होती.
कृणाल पंड्याने बाबा झाल्याची बातमी सोशल मीडियावर शेअर करताच चाहत्यांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. कविरच्या रुपात पंड्या कुटुंबात नवीन सदस्याचा प्रवेश झाला असून. हार्दिक पंड्याचा मुलगा अगस्त्यला भाऊ मिळाला आहे, अशी चर्चा चाहते करत आहेत. चाहत्यांशिवाय, अनेक सेलिब्रिटींनीही कृणालचे अभिनंदन केले आहे. झहीर खानची पत्नी, सागरिकानेदेखील कृणाल आणि पंखुरीचे अभिनंदन केले आहे.
कृणालने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत पाच एकदिवसीय आणि ९ टी २० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये ९८ सामने खेळले आहेत. यावर्षी, आयपीएलमध्ये तो लखनऊ सुपरजायंट्स संघाचा भाग होता.