KS Bharat dedicated his century to Lord Sri Rama : भारत आणि इंग्लंड यांच्यात २५ जानेवारीपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत अ आणि इंग्लंड लायन्स यांच्यात सामना खेळवला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज केएस भरतने शानदार शतक झळकावले आहे. शतक झळकावल्यानंतर केएस भरतने अशा प्रकारे सेलिब्रेशन केले की, ते आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
शतक प्रभू रामाला केले समर्पित –
केएस भरतने इंग्लंड लायन्सविरुद्ध शानदार फलंदाजी करत नरेंद्र मोदी स्टेडियमवर शतक झळकावले. शतक झळकावल्यानंतर केएस भरतने मैदानाच्या मध्यभागी अशा प्रकारे सेलिब्रेशन केले की, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहत्यांना आवडत आहे. खरं तर, शतक झळकावल्यानंतर केएस भरतने ‘धनुष्यातून बाण सोडत असल्याचा’ हावभाव केले.
केएस भरत यांनी आपले शतक प्रभू रामाला समर्पित केले आहे. वास्तविक, २२ जानेवारीला अयोध्येत भगवान राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम आहे. या काळात संपूर्ण देश प्रभू श्रीरामाच्या भक्तीत तल्लीन झाला आहे. केएस भरतनेही हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये केएस भरत यांनी लिहिले की, ‘लक्षात ठेवण्यासारखे आहे, हॅशटॅग जय श्री राम.’
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंड संघाला मोठा धक्का, ‘हा’ स्टार खेळाडू भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेतून झाला बाहेर
पहिल्या दोन कसोटीसाठी भारतीय संघात निवड –
२५ जानेवारीपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी विकेटकीपर फलंदाज केएस भरतचा टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे. केएस भरत कसोटी मालिकेपूर्वी जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. त्याचा उत्कृष्ट फॉर्म पाहता आता कर्णधार रोहित शर्मा त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देऊ शकतो असे दिसते. केएस भरतने टीम इंडियासाठी आतापर्यंत फक्त पाच कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने १२९ धावा केल्या आहेत. केएस भरत व्यतिरिक्त आणखी दोन यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल आणि ध्रुव जुरेल यांचाही टीम इंडियात समावेश करण्यात आला आहे.
पहिल्या दोन कसोटींसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.