भारत आणि न्यूझीलंड दरम्यान या महिन्यात तीन टी २० आणि दोन कसोटी सामने खेळले जाणार आहेत. टी २० साठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. टी २० संघाचं कर्णधारपद रोहित शर्माकडे सोपवण्यात आलं आहे. तर उपकर्णधार केएल राहुल असणार आहे. दुसरीकडे कसोटीसाठी भारतीय संघाची अजूनही निवड करण्यात आली नाही. मात्र लवकरच कसोटी संघाची घोषणा होण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीसाठी विराट कोहलीला आराम दिला जाण्याची शक्यता आहे. त्याच्या जागेवर रोहित शर्मा कर्णधारपद भूषवेल असं सांगण्यात येत आहे.
कसोटी मालिकेसाठी बीसीसीआय संघात काही बदल करण्याची शक्यता आहे. यष्टीरक्षक वृद्धिमान साहाला आराम देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याऐवजी संघात केएस भारतला दुसरा यष्टिरक्षक म्हणून संधी मिळू शकते. भारत राखीव खेळाडू म्हणून ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. आता त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतने स्थानिक क्रिकेटमध्ये चांगल्या धावा केल्या आहे. तर मागच्या काही वर्षात इंडिया ए संघाचा नियमित सदस्य राहिला आहे. तसेच आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे वृद्धिमान साहाचं वय हा एक मुद्दा ठरू शकतं. वृद्धिमान साहाचं वय ३७ आहे. तर केएस भारतचं वय २८ वर्षे आहे.
दोन खेळाडूंची संघात निवड न केल्याने हरभजन सिंग संतापला; म्हणाला…
भारतने फर्स्ट क्लास क्रिकेट खेळलेल्या ७८ सामन्यात ३७.२४ च्या सरासरीने ४,२८३ धावा केल्या आहेत. या खेळीत २३ अर्धशतकं आणि ९ शतकांचा समावेश आहे. तर लिस्ट एमध्ये खेळलेल्या ५१ सामन्यात २८.१४ च्या सरासरीने १,३५१ धावा केल्या आहेत. यात पाच अर्धशतकं आणि तीन शतकांचा समावेश आहे. भरतने आयपीएल २०२१ च्या ८ सामन्यात ३८.२० च्या सरासरीने १९१ धावा केल्या आहेत. एका सामन्यात शेवटच्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला होता.