Biggest Record In Cricket History : क्रिकेटच्या इतिहासात अनेक विक्रम रचले गेले आहेत. परंतु, १२७ वर्षांपूर्वी म्हणजे आजच्याच दिवशी २२ ऑगस्टला भारताच्या एका दिग्गज खेळाडूनं मैदानात धावांचा पाऊस पाडून एकाच दिवशी दोन शतक ठोकले होते. या खेळाडूच्या नावावर मोठ्या विक्रमाची नोंद असून आतापर्यंत कोणत्याही क्रिकेटरने हा विक्रम मोडला नाहीय. कुमार श्री रणजीत सिंहजी असं या स्टार खेळाडूचं नाव असून त्यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये या विक्रमाला गवसणी घातली होती. एक दिवसात दोनवेळा शतक ठोकण्याचा कारनामा त्यांनी केला होता.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रणजीत सिंहजीने वर्ष १८९६ मध्ये ससेक्ससाठी खेळत असताना ही चमकदार कामगिरी केली होती. इंग्लडच्या होव शहरात खेळलेल्या त्या सामन्यात यॉर्कशायरने पहिल्या डावात ४०७ धावा केल्या होत्या. त्यानंतर प्रत्युत्तरात ससेक्सच्या टीमने तिसऱ्या दिवशी रणजीत सिंहजी यांच्या शतकी खेळीच्या जोरावर पहिल्या डावात १९१ धावा केल्या होत्या. त्यामुळे त्यांना फॉलोऑनचा सामना करावा लागला. त्यानंतर रणजीत सिंहजीने तिसऱ्या दिवशी पुन्हा शतकी खेळी करून ससेक्सला दोन विकेट्स गमावल्यानंतर २६० धावांपर्यंत पोहोचवलं आणि सामना रद्द झाला.

नक्की वाचा – वनडेत लाजिरवाणा विक्रम! तरीही आशिया चषकात प्रवेश, आता विश्वचषकही खेळणार टीम इंडियाचा ‘हा’ खेळाडू , कारण…

रणजीत सिंहजी यांच्यानंतर फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कोणत्याही फलंदाजाने दोन शतक ठोकले नाहीत. विक्टोरियासाठी खेळताना मॅथ्यू एलियटने ३१ डिसेंबर १९९५ ला १०४ धावा केल्या आणि त्यानंतर फॉलोऑन इनिंग्समध्ये १३५ धावा केल्या. परंतु, एलियटने पहिल्या डावात केलेल्या धावांमधून ९८ धावा ३० डिसेंबरलाच केल्या होत्या. मात्र, एलियटची तुलना रणजीत सिंहजी यांच्या विक्रमाशी करता येऊ शकत नाही.

स्पेनचा फलंदाज तारिक अली अवानने यूरोपियन चॅम्पियनशिपच्या डिव्हिजन २ मध्ये ४ सप्टेंबर २०१२ ला दोन शतक केले होते. पहिल्यांदा तरिकने एस्टोनिया विरोधात ६६ चेंडूत नाबाद १५० धावांची खेळी केली होती. पुन्हा त्याच दिवशी पोर्तुगालविरुद्ध झालेल्या सेमीफायनलमध्ये १४८ धावा केल्या. तारिक अली अवानने टी-२० क्रिकेटमध्ये हे दोन्ही शतक ठोकले होते.

गुजरातच्या काठियावाड येथे जन्मलेल्या रणजीत सिंहजी हे भारतासाठी कधीच कसोटी क्रिकेट खेळू शकले नाहीत. परंतु, ते इंग्लंडसाठी कसोटी क्रिकेट खेळणारे पहिले भारतीय बनले होते. रणजीत सिंहजी यांनी (१८९६-१९०२) दरम्यान इंग्लंडसाठी एकूण १५ सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता आणि हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झाले होते. याचदरम्यान त्यांनी ४४.९५ च्या सरासरीनं कसोटीत ९८९ धावा केल्या होत्या. ज्यामध्ये दोन शतकांचा समावेश आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ks ranjitsinhji smashes 2 centuries in a single day first class indian cricket no one broke the record still which is in world cricket history nss