पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून झालेला पराभव पचवणे अवघड असले, तरी आता आम्ही भविष्याचा विचार करणे गरजेचे असल्याचे भारताचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादव म्हणाला.‘‘चेन्नईपासून सुरू झालेला आमचा विश्वचषकाचा प्रवास अहमदाबाद येथे निराशाजनक निकालासह संपला. मात्र, सहा आठवडय़ांच्या कालावधीत केलेल्या कामगिरीबाबत आम्ही समाधानी आहोत. विश्वचषक जिंकता न आल्याचे दु:ख निश्चित आहे. परंतु पुढील संधीसाठी आम्ही अधिक मेहनत घेऊ. अंतिम सामन्यातील पराभव पचवणे अवघड असले, तरी आता आम्ही भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. आयुष्य सुरू राहणार आहे. वेदना विसण्यासाठी वेळ जावा लागेल,’’ असे कुलदीपने आपल्या ‘एक्स’वरील पोस्टमध्ये लिहिले.

कुलदीपने विश्वचषकाच्या ११ सामन्यांत १५ गडी बाद केले. भारताने विश्वचषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी सलग १० सामने जिंकले होते. मात्र, अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाने सहा गडी राखून पराभूत केले होते. ‘‘आमच्या प्रशिक्षक आणि साहाय्यक प्रशिक्षकांचे खूप आभार. त्यांनी प्रत्येक प्रतिस्पध्र्याचा पूर्ण अभ्यास करून आमच्याकडून तयारी करवून घेतली. त्यांचे मार्गदर्शन आमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले. तसेच नऊ स्टेडियमवर चाहत्यांकडून मिळालेल्या पािठब्यामुळे आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करण्याचीप्रेरणा मिळाली. जगभरातील भारतीय चाहत्यांकडून मिळणाऱ्या पाठिंब्यासाठी आम्ही स्वत:ला भाग्यवान मानतो,’’ असेही कुलदीपने नमूद केले.

हेही वाचा >>>IND vs AUS 1st T20 : शेवटच्या बॉलवर सिक्स मारून सामना जिंकला, पण त्या धावा रिंकूला मिळाल्याच नाहीत, कारण…

निराशा शब्दांत मांडणे अवघड – सिराज

विश्वचषक जिंकण्यात आलेल्या अपयशाबद्दल वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजनेही आपल्या भावना व्यक्त केल्या. ‘‘आम्हाला विश्वचषकाचा अपेक्षित शेवट करता आला नाही, पण भारताचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी सर्वात अभिमानाची गोष्ट आहे. देशाकडून खेळणे हे माझे स्वप्न होते आणि ते मी जगत आहे. विश्वचषक न जिंकता आल्याची निराशा शब्दांत मांडणे अवघड आहे. हा पराभव पचवणे खूप अवघड जात आहे. परंतु देशाला यश मिळवून देण्यासाठी आम्ही कायम प्रयत्न करत राहणार,’’ असे सिराजने ‘एक्स’वर लिहिले.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kuldeep yadav reaction after falling short of the world cup title 2023 amy