नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यात कुलदीप यादवने आपल्या फिरकी गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केलं. आपल्या या यशाचं श्रेय कुलदीप यादवने ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकीपटू शेन वॉर्नला दिलं आहे. शेन वॉर्नने केलेल्या मार्गदर्शनाला मला फायदा झाल्याचं कुलदीप यादव म्हणाला, तो CricketNext या संकेतस्थळाशी बोलत होता.

“ज्या क्षणी आम्ही ऑस्ट्रेलियात दाखल झालो, त्यावेळपासून शेन वॉर्न आमच्यासोबत होता. रवी सरांनी माझी शेन वॉर्नसोबत ओळख करुन दिली. त्यानंतर खेळ सुरु व्हायच्या प्रत्येक दिवसाआधी मी वॉर्नसोबत चर्चा करायचो. ऑस्ट्रेलियातल्या वातावरणाशी जुळवून घेत चेंडू कसा टाकायचा, कोणत्या जागेवर टप्पा ठेवल्यास चेंडू उसळी घेईल याचे सर्व धडे मला वॉर्नने दिले. अनेकदा वॉर्नने मला हुरुपही दिला.” कुलदीप शेन वॉर्नने केलेल्या मार्गदर्शनाबद्दल बोलत होता.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात कुलदीपला संधी मिळाली होती. या सामन्यात कुलदीपने ऑस्ट्रेलियाच्या डावाला खिंडार पाडलं होतं. मात्र पावसाने व्यत्यय आणल्यामुळे हा सामना अनिर्णित राहिला. यानंतर न्यूझीलंडविरुद्ध मर्यादीत षटकांच्या मालिकेतही कुलदीपने चांगली गोलंदाजी केली. विश्वचषक अवघ्या काही महिन्यांवर आलेला असताना, आपण आताही फोन आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून वॉर्नशी बोलत असल्याचं कुलदीप म्हणाला. याचसोबत आयपीएलमध्येही आपण वॉर्नशी चर्चा करणार असल्याचं कुलदीपने सांगितलं.

अवश्य वाचा – विश्वचषकासाठी उमेश यादव योग्य पर्याय – आशिष नेहरा

Story img Loader