वृत्तसंस्था, दुबई

कुलदीप यादव (२/४०) आणि वरुण चक्रवर्ती (२/४५) यांच्या प्रभावी फिरकी गोलंदाजीमुळे चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडची धावसंख्या मर्यादित ठेवली. न्यूझीलंडने ५० षटकांत ७ बाद २५१ धावा केल्या.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या संथ खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरणार अशी अपेक्षा होती आणि तेच झाले. भारताच्या चार फिरकीपटूंनी मिळून ३८ षटके टाकताना १४४ धावांत सहा बळी मिळवले. डावखुरे फिरकी गोलंदाज रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेलने एकेक गडी बाद केला.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या न्यूझीलंडने सुरुवात दमदार केली. मोहम्मद शमी आणि हार्दिक पंड्या या वेगवान गोलंदाजांना खेळपट्टीकडून फारशी मदत मिळाली नाही. याचा रचिन रवींद्र (२९ चेंडूंत ३७) आणि विल यंग (२३ चेंडूंत १५) यांनी फायदा घेतला. न्यूझीलंडचे अर्धशतक सात षटकांतच धावफलकावर लागले. हे चित्र बदलण्यासाठी कर्णधार रोहित शर्माने फिरकीपटूंच्या हाती चेंडू सोपवला.

वरुणने यंगला पायचीत करत भारताला पहिले यश मिळवून दिले. मग कुलदीपने रचिन आणि केन विल्यम्सन (११) या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडले. पाठोपाठ रवींद्र जडेजाने टॉम लॅथमला (१४) बाद केल्याने न्यूझीलंडची ४ बाद १०८ अशी स्थिती झाली. यानंतर डॅरेल मिचेल (१०१ चेंडूंत ६३) आणि ग्लेन फिलिप्स (५२ चेंडूंत ३४) यांनी संयमाने फलंदाजी करताना न्यूझीलंडचा डाव सावरला. या दोघांनी १५ हून अधिक षटके खेळून काढताना ५७ धावा जोडल्या. वरुणने फिलिप्सचा त्रिफळा उडवत न्यूझीलंडला आणखी एक धक्का दिला.

फिरकीविरुद्ध आव्हानात्मक ठरत असलेल्या या खेळपट्टीवर मिचेलने एक बाजू लावून धरली. त्याने एक-दोन धावांवर भर दिला. त्याने ६३ धावांच्या खेळीत केवळ तीन चौकार मारले. मोहम्मद शमीने मिचेलला बाद केल्यानंतर मायकल ब्रेसवेलने (४० चेंडूंत नाबाद ५३) न्यूझीलंडच्या डावाची सूत्रे आपल्या हाती घेतली. त्याने तीन चौकार आणि दोन षटकारांची आतषबाजी करताना अर्धशतक साकारले. त्यामुळे न्यूझीलंडला अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला.

भारताचे ढिसाळ क्षेत्ररक्षण

● अंतिम लढतीत भारतीय संघाने ढिसाळ क्षेत्ररक्षण करताना चार झेल सोडले. सर्वप्रथम मोहम्मद शमीने आपल्याच गोलंदाजीवर रचिन रवींद्रला जीवदान दिले. रचिन त्या वेळी २८ धावांवर होता. चेंडू शमीच्या हातावर जोरात आदळल्याने त्याला दुखापतही झाली.

● पुढीलच षटकात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर श्रेयस अय्यरने रचिनचा झेल सोडला. रचिनने स्वीपचा फटका हवेत मारला. सीमारेषेवरील श्रेयसने चेंडूच्या दिशेने धाव घेतली. मात्र, अखेरच्या काही पावलांवर त्याचा वेग कमी झाल्याने त्याला चेंडू पकडण्यासाठी सूर मारावा लागला. चेंडूजवळ पोहोचूनही अखेर त्याला झेल पूर्ण करता आला नाही.

● न्यूझीलंडच्या डावातील ३५व्या षटकात अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर कर्णधार रोहित शर्माकडून झेल सुटला. अन्य तीन झेलच्या तुलनेत हा सर्वांत अवघड झेल होता. डॅरेल मिचेलने आपल्या डाव्या बाजूस वरच्या दिशेने फटका मारला. रोहितने उडी मारून उजवा हात वर केला, पण चेंडू त्याच्या हाताला लागून निसटला. त्या वेळी मिचेल ३८ धावांवर होता.

● पुढच्या षटकात शुभमन गिलने ग्लेन फिलिप्सला जीवदान दिले. रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर फिलिप्सने मोठा फटका मारला. सीमारेषेवरील गिलने धावत येत चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू दोन्ही हाताला लागूनही गिलला झेल पकडता आला नाही.

Story img Loader