डावखुऱ्या शैलीदार फलंदाजीने क्रिकेट जगताना मोहिनी घालणारा श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज कुमार संगकाराला यंदाच्या सीएट सर्वोत्तम क्रिकेटपटू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. याचप्रमाणे २०१४-१५ वर्षांत एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २६४ धावा झळकावणारा भारताचा फलंदाज रोहित शर्माला या वेळी विशेष पुरस्काराने गौरवण्यात आले. सातत्याने धावांची टांकसाळ उघडून भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावणाऱ्या अजिंक्य रहाणेला या वेळी सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू हा पुरस्कार देण्यात आला.
श्रीलंकेने या वर्षी दमदार कामगिरी केली. त्यांनी इंग्लंडमध्ये पहिल्यांदाच कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला, त्याचबरोबर त्यांनी पाकिस्तानलाही पराभूत केले. या वर्षभरात आठ कसोटी सामन्यांमध्ये १,०५२ धावा संगकाराने केल्या आहेत, त्याचबरोबर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याने ३५ सामन्यांमध्ये सात शतकांच्या जोरावर १,७५४ धावा फटकावल्या. या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर त्याला सर्वोत्तम क्रिकेटपटू हा बहुमान देण्यात आला. रोहितने या वर्षांत दुखापतीनंतर भारतीय संघात पुनरागमन करताना श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात एकदिवसीय क्रिकेटमधील २६४ अशी सर्वोत्तम धावसंख्या रचली, दोनदा द्विशतक झळकावणारा तो पहिला क्रिकेटपटू ठरल्याने त्याला विशेष पुरस्कार देण्यात आला. वेस्ट इंडिजच्या किरॉन पोलार्डला या वेळी लोकप्रिय क्रिकेटपटूचा पुरस्कार मिळाला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा