येथे मला अलविदा करण्यासाठी उपस्थित असलेले श्रीलंकेचे राष्ट्रपती, पंतप्रधान, संसदेतील सदस्य, हितचिंतक, माझे चाहते, विराट कोहली आणि भारतीय संघ, श्रीलंकेचा संघ यांचे मी पहिल्यांदा धन्यवाद मानू इच्छितो.
शाळेमध्येच मी क्रिकेट खेळायला सुरुवात केली, ट्रिनिटी महाविद्यालयाने मला चांगले मैदान उपलब्ध करून दिले. शाळेमध्ये जाणं माझ्यासाठी एक अद्भुतानुभव होता. माझा क्रिकेटचा पाया तिथेच रचला गेला. मला बऱ्याच प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले आणि त्यांचा मी सदैव ऋणी राहीन. मी लहान असताना माझे बाबा मला बऱ्याच प्रशिक्षकांकडे घेऊन गेले आणि त्यामुळेच मला चांगले क्रिकेट खेळता आले, त्यामुळे त्यांचेही धन्यवाद.
मला आतापर्यंत लाभलेले सर्व कर्णधार आणि संघ सहकाऱ्यांचे मी आभार मानतो. कारण त्यांच्याकडून मला प्रेरणा आणि प्रोत्साहन मिळाले. तुम्हा साऱ्यांकडून मी बरेच काही शिकलो, ज्याचा उपयोग मला फक्त क्रिकेटमध्येच नाही तर यापुढे आयुष्यातही नक्कीच होईल. तुम्ही जो मला पाठिंबा दिला, त्याचेच बळ माझ्या पाठीशी नेहमीच राहिले. तुम्हा साऱ्यांकडून मला नीतिमूल्य शिकता आली, त्यामुळेच यानंतर मी ड्रेसिंग रूममधील या साऱ्या गोष्टींना मुकणार असल्याचे कळताच ऊर भरून आला आहे.
चार्ली आणि सुथामी ऑस्टीन यांनी माझे चांगले व्यवस्थापन केले, तुम्ही फक्त तेवढय़ापुरतेच मर्यादित राहिला नाहीत तर माझ्या कुटुंबाचा एक भाग झालात. तुमचे जेवढे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत. पण आजच्या या दिवसाचे औचित्य साधून तुमचे धन्यवाद मानू इच्छितो. तुम्ही फक्त माझे व्यवस्थापक नव्हतात, तर चांगले मित्रही होतात. तुमचे सल्ले नेहमीच माझ्यासाठी उपयुक्त ठरले.
आयुष्यात मला आदर्शवत व्यक्ती शोधाव्या लागल्या नाहीत, कारण त्या माझ्या घरातच मला लाभल्या. माझे पालक इथेच आहेत, त्यांच्या पलीकडे मला जाता येऊच शकत नाही. एवढे अवर्णननीय कुटुंब मिळायला नक्कीच भाग्य लागते, या कुटुंबात जन्माला आलो हे माझे परम भाग्यच म्हणायला हवे. गेल्या तीस वर्षांमध्ये माझ्या पाठीशी ठाम उभे राहणारे, माझ्यावर मनापासून प्रेम करणारे मित्र, कुटुंबीय इथे उपस्थित आहेत. त्यांच्याकडून मला अमाप प्रेम मिळाले, ते शब्दांत व्यक्त करता येऊच शकत नाही. मला बऱ्याचदा विचारले गेले की, तुझे आदर्श कोण?, तुला ते कुठे भेटले? मला आदर्शवत व्यक्ती शोधायला बाहेर जावेच लागले नाही. मी तुम्हाला जास्त व्याकूळ करत असेन, त्याबद्दल माफ करा. पण खरंच मला जसे कुटुंब मिळाले तसे सर्वानाच मिळायला हवे, असे मी म्हणेन.
माझ्या मागे ठाम उभी राहणारी भावंडं मला मिळाली. मी क्रिकेट खेळत असेन किंवा नसेल, माझ्याकडून चांगली कामगिरी होत असेल किंवा नसेल, पण घरी गेल्यावर किंवा त्यांच्याशी बोलल्यावर मला नेहमीच सुरक्षित वाटायचं. यासाठीच आई-बाबांनाही मी धन्यवाद देऊ इच्छितो.
देशाकडून खेळताना मला चाहत्यांनी भरपूर प्रेम दिलं. विराट कोहली आणि भारतीय संघाने जे माझ्याबद्दल व्यक्त केले, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. गेल्या बऱ्याच वर्षांपासून तुम्ही आमचे कडवे प्रतिस्पर्धी आहात. हा सामना हरलो असलो तरी याबद्दल जास्त चिंतीत नाही, कारण पुढच्या सामन्यात सर्वोत्तम  खेळ साकारून तुम्हाला पराभूत करण्याचा आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. अँजेलो आणि तू बनवलेला संघ नक्कीच दर्जेदार आहे. तुम्ही अथक मेहनत घ्याल. मला खात्री आहे की, पराभवाने खचून न जाता श्रीलंकेचा ध्वज अधिक उंचीवर न्याल, अशी मला आशा आहे.

Story img Loader