ट्वेन्टी-२० प्रकारातून रविवारी निवृत्ती जाहीर करणाऱ्या कुमार संगकाराने २०१५मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर आपण एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती पत्करण्याची शक्यता आहे, असे म्हटले आहे. श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज संगकाराने ‘नैसर्गिक प्रवाह’ असे याबाबत नमूद केले आहे.
‘‘एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटचा विचार केल्यास काळानुसार टिकणे कठीण जाते. आता मी ३६ वर्षांचा आहे, पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकाप्रसंगी मी ३७ वर्षांचा असेन. त्यानंतरच्या विश्वचषकाच्या वेळी मी ४१ वर्षांचा होईन. मी त्या वेळी खेळत असेन, असे मला वाटत नाही. त्यामुळेच नैसर्गिक प्रवाहानुसार २०१५चा विश्वचषक माझ्या कारकिर्दीतील अखेरचा असेल,’’ असे संगकाराने सांगितले.
‘‘कसोटी क्रिकेटसाठी लागणारे फॉर्म, तंदुरुस्ती आणि आनंद हे घटक अद्याप माझ्यामध्ये कायम आहेत, त्यामुळे मी खेळत राहू शकेन. परंतु माझ्या कारकिर्दीचा उत्तरार्ध सुरू आहे, हे मात्र नाकारता येणार नाही,’’ असे तो पुढे म्हणाला.
संगकाराप्रमाणेच महेला जयवर्धने यानेही ट्वेन्टी-२०मधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. त्यामुळे श्रीलंकेच्या क्रिकेटला आता संक्रमण अवस्थेला सामोरे जावे लागणार आहे. काही वर्षांपूर्वी भारतीय क्रिकेटही अशाच क्रिकेटमधून गेले होते. लाहिरू थिरिमाने आणि दिनेश चंडिमल हे दोन खेळाडू आम्हा दोघांची उणीव भासू देणार नाही, असा आशावाद संगकाराने या वेळी प्रकट केला.
‘‘अँजेलो मॅथ्यूज आता कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार म्हणून परिपक्व होतो आहे. दिनेश हेसुद्धा युवा नेतृत्व आहे. त्यामुळे श्रीलंकेचे क्रिकेट सध्या सुरक्षित हातांमध्ये आहे,’’ असे संगकाराने सांगितले. त्याने १२२ कसोटी, ३६९ एकदिवसीय आणि ५० ट्वेन्टी-२० सामन्यांत श्रीलंकेने प्रतिनिधित्व केले आहे.
‘‘नव्या गुणवत्तेला संधी देण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे दडपण सांभाळण्यासाठी त्यांना सज्ज करण्यासाठी ही पावले उचलली आहेत,’’ असे तो पुढे म्हणाला.
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून जरी संगकाराने निवृत्तीची घोषणा केली असली तरी फ्रेंचायझींवर आधारित ट्वेन्टी-२० क्रिकेट मात्र तो खेळत राहणार आहे. याविषयी तो म्हणाला, ‘‘ट्वेन्टी-२० हा प्रकार मला अतिशय भावला, हे मी सर्वप्रथम सांगू इच्छितो. दुसरे म्हणजे क्रिकेट हे माझे जगणे आहे. जे पुढील काही वष्रे तरी बदलणार नाही. आम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू आहोत.’’
ट्वेन्टी-२०मधील आपल्या निवृत्तीविषयी संगकाराने सांगितले की, ‘‘हे खरेच फार कठीण नव्हते. येत्या कालखंडात कोणत्याही महत्त्वाच्या ट्वेन्टी-२० स्पर्धा नाहीत. २०१५च्या विश्वचषकापर्यंत आम्ही एखाद-दुसरा ट्वेन्टी-२० सामना खेळू. मी याबाबत घोषणा केली असती काय किंवा नसती काय, ही माझ्या कारकिर्दीतील अखेरची ट्वेन्टी-२० स्पर्धा आहे. तुम्ही निवृत्ती पत्करता, तो दिवस कधीच येऊ नये अशी आशा बाळगता, परंतु तो दिवस नक्की येतो,’’ हे सांगून संगकाराने मोकळेपणे स्मित केले.

‘‘लाहिरू थिरिमाने आणि दिनेश चंडिमल हे दोघे क्रिकेटमधील कोणत्याही प्रकारात खेळण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यामुळे मी आणि जयवर्धनेने आज-उद्या काय किंवा केव्हाही निवृत्ती पत्करल्यास श्रीलंकेच्या क्रिकेटमध्ये मोठी पोकळी निर्माण होणार नाही.’’
कुमार संगकारा