श्रीलंकेचा अनुभवी फलंदाज आणि यष्टीरक्षक कुमार संगकारा ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर या प्रकारातून निवृत्त होणार आहे. ३६ वर्षीय संगकारा आतापर्यंतच्या सर्व ट्वेन्टी-२० विश्वचषकात श्रीलंकेच्या संघाचा अविभाज्य घटक होता. यावर्षीही त्याची भूमिका श्रीलंकेसाठी निर्णायक असणार आहे. ‘हा माझा शेवटचा ट्वेन्टी-२० विश्वचषक असणार आहे. यानंतर श्रीलंकेसाठी मी ट्वेन्टी-२० खेळणार नाही. यामुळे वाईट वाटते आहे पण हे सत्य आहे’, असे संगकाराने सांगितले. श्रीलंकेसाठी ट्वेन्टी-२० खेळणार नसलो तरी जगभरात विविध ठिकाणी होणाऱ्या ट्वेन्टी-२० लीग स्पर्धामध्ये सहभागी होणार असल्याचे संगकाराने स्पष्ट केले. २००९ ट्वेन्टी-२० विश्वचषकात संगकाराच्या नेतृत्त्वाखाली श्रीलंकेच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. २०१२ ट्वेन्टी-२० विश्वचषकात तो कर्णधार असताना संघाने अंतिम फेरी गाठली होती मात्र त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. संगकाराने ५० ट्वेन्टी-२० सामन्यात श्रीलंकेचे प्रतिनिधित्त्व करताना ३२.७७ च्या सरासरीने १३११ धावा केल्या आहेत.