श्रीलंकेचा आधारस्तंभ कुमार संगकारा भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीनंतर निवृत्त होणार आहे. भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध तीन कसोटी सामने खेळणार आहे. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यानंतर संगकारा कसोटी क्रिकेटला अलविदा करणार आहे. दरम्यान पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत खेळणार नसल्याचे संगकाराने स्पष्ट केले. ‘विश्वचषकानंतर मला निवृत्त व्हायचे होते. मात्र निवडसमितीने मी खेळावे अशी विनंती केली. त्यामुळे चार कसोटी सामने खेळायला मी होकार दिला’, असे संगकाराने सांगितले. संगकाराने १३१ कसोटींत श्रीलंकेचे प्रतिनिधित्व करताना ५८.४३ च्या सरासरीने १२,२७१ धावा केल्या असून, ३८ शतके आणि ५२ अर्धशतके झळकावली आहेत. गेल्या वर्षी ट्वेन्टी-२० विश्वचषकानंतर ट्वेन्टी-२० प्रकारातून तर यंदाच्या विश्वचषकानंतर एकदिवसीय क्रिकेटमधून संगकाराने निवृत्ती घेतली होती.

Story img Loader