Kusal Parera Fastest T20I Century For Sri Lanka: श्रीलंकेचा संघ सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. जिथे दोन्ही संघांमध्ये टी-२० मालिका खेळवली जात आहे. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात श्रीलंकेच्या कुशल परेराने उत्कृष्ट फलंदाजी करत शतकी कामगिरी केली आहे. परेराने न्यूझीलंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत अवघ्या ४४ चेंडूत शतक झळकावले. या सामन्यात परेराने शतक झळकावून १४ वर्षे जुना विक्रमही मोडला आहे.
कुशल परेराने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात अवघ्या ४४ चेंडूत शानदार शतक झळकावले. या शतकी खेळीत परेराने १३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १०१ धावांची खेळी केली. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट २१९.५६ राहिला आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कुशल परेराचं पहिलं शतक आहे. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कुशल परेराने श्रीलंकेच्या कोणत्याही खेळाडूने झळकावलेले हे सर्वात जलद शतक आहे.
कुशल परेरा आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी सर्वात जलद शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे. यासह त्याने श्रीलंकेचा माजी फलंदाज तिलकरत्ने दिलशानचा विक्रम मोडीत काढला आहे. २०११ मध्ये, दिलशानने ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये श्रीलंकेसाठी सर्वात जलद शतक झळकावले, जे ५५ चेंडूत केले होते. याचबरोबर तिलकरत्ने दिलशाननंतर १३ वर्षांनंतर पहिल्यांदाच एखाद्या श्रीलंकेच्या खेळाडूने टी-२० मध्ये शतक झळकावले आहे.
तिसऱ्या टी-२० सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या. श्रीलंकेकडून फलंदाजी करताना कुशल परेराने सर्वाधिक १०१ धावांची खेळी केली. याशिवाय कर्णधार अस्लंकाने २४ चेंडूत ४६ धावांची खेळी केली. रॉबिन्सन आणि रचिनने संघाला चांगली सुरूवात करून दिली. पण त्यांनी विकेच गमवाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज श्रीलंकेच्या गोलंदाजीसमोर फार काळ टिकू शकले नाहीत. रचिन रवींद्रने ३९ चेंडूत ६९ धावांची खेळी करत दणदणीत अर्धशतक झळकावले.
हेही वाचा – IND vs AUS: सिडनी कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू झाला संघाबाहेर; गौतम गंभीरने दिली माहिती
अखेरीस श्रीलंकेने न्यूझीलंड संघावर ७ धावांनी विजय मिळवला. न्यूझीलंडने सुरूवातीचे दोन्ही टी-२० सामने जिंकल्याने यजमान संघाने २-१ च्या फरकाने मालिका आपल्या नावे केली आहे. कुशल परेरा तिसऱ्या टी-२० सामन्याचा सामनावीर ठरला. तर जॅकोब डफी हा मालिकावीर ठरला.