सलामीवीर कुशल परेराच्या ९९ धावांच्या खेळीच्या जोरावर श्रीलंकेने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर ८ विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे.
पावसाच्या व्यत्ययामुळे हा सामना ३८ षटकांचा खेळवण्यात आला होता. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना जॉन्सन चार्ल्स आणि मार्लन सॅम्युअल्स यांच्या अर्धशतकांच्या जोरावर २१४ धावा केल्या. चार्ल्सने ७ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ८३ धावांची खेळी साकारली, तर सॅम्युअल्सने ४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ६३ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना परेरा आणि थिरिमाने यांनी दमदार फलंदाजी करीत संघाला विजय मिळवून दिला. परेराने ६ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर नेत्रदीपक खेळी साकारली, त्याला शतकासाठी फक्त एक धाव कमी पडली. थिरिमानेने अखेपर्यंत किल्ला लढवत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याने ५ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ८१ धावांची खेळी साकारली.

Story img Loader